Gopichand Padalkar : पुण्यात एक ‘कॉकटेल घर’; ‘सासू ख्रिश्चन, बाप मराठा अन् आई.., पवार कुटुंबावर पडळकरांची नाव न घेता गलिच्छ भाषेत टीका

पुणे : भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. सांगलीतील ऋतुजा पाटील हत्याप्रकरणावरून पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चात बोलताना पडळकरांनी नाव न घेता पवार कुटुंबाला “कॉकटेल घर” संबोधत आक्षेपार्ह टीका केली. या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
पडळकरांचे वादग्रस्त विधान
पुण्यातील या मोर्चादरम्यान पडळकरांनी पवार कुटुंबावर टीका करताना म्हटले, “एका गटाचे लोक मोर्चात पुढे-पुढे करतात. त्यांचं घर पण तसंच आहे. संकष्टीला उपवास असतो, त्या दिवशी त्यांच्या घरी मटण येतं, एकादशीला चिकन येतं. दगडूशेठ गणपतीला मटण खाऊन जातात. तुम्हाला माहिती आहे ते घर कोणतं. तिथली सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे आणि आई दुसरीच आहे. असं ते कॉकटेल कुटुंब आहे.”
पडळकरांचे हे विधान स्पष्टपणे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निशाणा साधणारे होते. यापूर्वीही पडळकरांनी पवार कुटुंबावर अनेकदा आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या आहेत, ज्यामुळे ते सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.
प्रशांत जगताप यांचे तीव्र प्रत्युत्तर
पडळकरांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तीव्र प्रत्युत्तर दिले आहे. जगताप म्हणाले, “पडळकर ही एक प्रवृत्ती आहे. त्यांनी पवार कुटुंबीयांवर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. ज्यांची ग्रामपंचायतीत निवडून येण्याची लायकी नाही, अशांना भाजपकडून आमदारकी दिली जाते आणि विरोधी पक्षातील नेत्यांवर अशा नीच शब्दांत बोलायला लावलं जातं. मंगळसूत्र चोरीप्रकरणी पोलिसांनी पडळकरांना बेड्या ठोकल्या होत्या. अशा व्यक्तीला पवार कुटुंबावर बोलण्याचा काय अधिकार आहे? येणाऱ्या काळात महाराष्ट्राची जनता त्यांना योग्य उत्तर देईल.”
गोपिचंद पडळकरांचा वादग्रस्त इतिहास
गोपिचंद पडळकर यांनी यापूर्वीही शरद पवार यांना “महाराष्ट्राला झालेला कोरोना” असे संबोधून वाद ओढवून घेतला होता. त्या प्रकरणी बारामती न्यायालयात खटला दाखल झाला होता, पण नुकतेच त्यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. पडळकरांचे पवार कुटुंबाविरोधातील आक्षेपार्ह विधानांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पुढे काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.





