Pawana Dam Accident : आनंदाचा प्रवास दु:खात विरला! पवना नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा करुण अंत
Pawana Dam Accident : शुक्रवारची सहल ठरली शेवटची; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू, पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन.

Pawana Dam Accident – मित्रांसोबत पवना नगर येथे फिरायला गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (२० फेब्रुवारी) दुपारी घडली. हृतिक कैलास साखरे (२४, काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हृतिक हा आपल्या मित्रांसोबत पवनानगर येथे फिरायला आला होता. सर्वजण पवना नदीत पोहण्यासाठी उतरले.
मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हृतिक नदीत बुडाला. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पवना नदीत शोध घेत हृतिकला पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.





