भोजपुरी स्टार पवन सिंगची भाजपमधून हकालपट्टी ; काराकाटमधून अपक्ष म्हणून मैदानात

Pawan Singh । भोजपुरी पॉवरस्टार पवन सिंग यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली. राज्य मुख्यालयाचे प्रभारी अरविंद शर्मा यांनी यासंबंधी एक पत्र जारी केले आहे. जारी केलेल्या पत्रात तुम्ही लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवत असल्याचे म्हटले आहे. तुमचे हे काम पक्षविरोधी आहे” असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पक्षाकडून कारवाईचे पत्र जारी करण्यात आलंय.
पक्षाकडून जारी केलेल्या पत्रात, “पवन सिंह निवडणूक लढवत असल्याने पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. निवडणूक लढवून तुम्ही (पवन सिंह) हे पक्षशिस्तीविरुद्ध केल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे या पक्षविरोधी कृत्यासाठी माननीय प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार तुमची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
पवन सिंह काराकाटमधून अपक्ष उमेदवार Pawan Singh ।
पवन सिंह बिहारच्या काराकाट लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी अनेकवेळा पीएम मोदींविरोधात वक्तव्ये केली आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप नेते प्रेम कुमार यांनी पक्ष पवन सिंह यांच्यावर कारवाई करू शकतो, असा इशारा दिला होता. आता भाजपने पवन सिंह यांच्यावर कारवाई केली आहे.
काराकाट लोकसभा जागेसाठी सातव्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. उपेंद्र कुशवाह हे एनडीएचे उमेदवार आहेत. या जागेवर तिरंगी लढत होत आहे. महाआघाडीकडून राजा राम कुशवाह रिंगणात असताना पवन सिंह यांनी अपक्ष म्हणून प्रवेश करून एनडीएतील तणाव वाढवला आहे.
PM मोदींच्या आगमनापूर्वी कारवाई Pawan Singh ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 मे रोजी काराकाटमध्ये निवडणूक प्रचारासाठी सभा घेणार आहेत. उपेंद्र कुशवाह यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन ते जनतेला करणार आहेत. पीएम मोदींच्या आगमनापूर्वीच भोजपुरी पॉवरस्टार पवन सिंह यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.





