Pawan Kalyan Birthday: मार्शल आर्ट्सपासून ‘मेगा स्टार’पर्यंतचा प्रवास करणारे नेते ,अभिनेते…

Pawan Kalyan Birthday: साऊथ सिनेमाचे दिग्गज अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आज आपला ५४वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म १९७१ साली आंध्र प्रदेशातील एका तेलुगु कुटुंबात झाला. त्यांचे खरं नाव कोनिडेला कल्याण बाबू असून, चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना त्यांनी ‘पवन कल्याण’ हे नाव स्वीकारले.
मार्शल आर्ट्समधून मिळाली ओळख
चित्रपटात येण्यापूर्वी पवन कल्याण मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेत होते. एका कार्यक्रमात त्यांनी ताकदीच्या जोरावर काचेचा स्लॅब फोडून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर त्यांना ‘पवन’ म्हणजेच हवा असे टोपणनाव मिळाले आणि हेच नाव पुढे त्यांची खरी ओळख ठरले.
सिनेमातील प्रवास
१९९६ मध्ये ‘अक्कडा अम्माई इक्कडा अब्बाई’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय कारकीर्द सुरू केली. दमदार व्यक्तिमत्व, प्रभावी अभिनय आणि भावनिक तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांमुळे त्यांनी साऊथ इंडस्ट्रीत वेगळे स्थान निर्माण केले.
राजकारणातही सक्रिय
पवन कल्याण फक्त अभिनेता नाहीत तर दिग्दर्शक, निर्माता आणि राजकारणीही आहेत. त्यांनी ‘जनसेना पक्ष’ स्थापन करून समाजकारणातही सक्रिय सहभाग घेतला. साधेपणा आणि जमिनीशी जोडलेली जीवनशैली यामुळे चाहत्यांनी त्यांना ‘मेगा स्टार’ची उपाधी दिली.
गब्बर सिंहने दिली नवी ओळख
२०११ च्या सुमारास करिअर थोडं मंदावलं असतानाच त्यांना तेलुगु चित्रपट ‘गब्बर सिंह’ मिळाला. हा चित्रपट हिंदी ‘दबंग’चा रिमेक होता. चित्रपट प्रचंड गाजला आणि पवन कल्याणला पुन्हा एकदा सुपरस्टारच्या शिखरावर नेऊन ठेवला. या चित्रपटातील एका गाण्यासाठी त्यांनी स्वतः आवाजही दिला होता.
आज पवन कल्याण फक्त अभिनेते नाही, तर जनतेच्या मनातील नेते म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या सिनेमापासून राजकारणापर्यंतच्या प्रवासाने लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे.





