पुणे | नदीसुधार प्रकल्पाचा मार्ग मोकळा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेकडून तब्बल साडेचार हजार कोटी रूपयांचा खर्च करून मुळा-मुठा नदीकाठ विसकन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणने २०१९ मध्ये दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका एनजीटीने निकाली काढली आहे.
त्यामुळे या प्रकल्पा अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. पर्यावरण अभ्यासक सारंग यादवडकर यांनी २०२३ मध्ये ही याचिका दाखल केली होती.
या प्रकल्पा अंतर्गत महापालिकेकडून मुळा-मुठा नदीच्या सुमारे ४४ कि.मी. काठाचे विकसन केले जाणार असून त्यात, नदीच्या काठावर काही भागात रस्ता विकसित करण्यासाठी झाडेही काढली जाणार आहेत,
तसेच प्रकल्पा अंतर्गत येणारी झाडे काढून त्याचे पुनर्रोपन करण्यात येणार आहे. या कामांचा मार्ग या निकालामुळे मोकळा झाला असल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
काय होते प्रकरण…
महापालिकेच्या या प्रकल्पामुळे नदीपात्र संकूचित होणार असल्याने तसेच नदीकाठची जैवविविधता नष्ट होणार असल्याचा आक्षेप घेत शहरातील पर्यावरण अभ्यासकांकडून या प्रकल्पास विरोध केला आहे.
मात्र, महापालिकेने त्यासाठीच्या सर्व मान्यता घेत हा प्रकल्प नदी पुनरूत्जीवनासाठी महत्वाचा ठरणार असून पर्यावरणाची हानी न करता उभारण्यात येणार असल्याचे सांगत या प्रकल्पास २०१९ मध्ये राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरण (State Environment Impact Assessment Authority) यांच्याकडे पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र घेतले होते.
मात्र, या प्रमाणपत्रावरच यादवाडकर यांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. तसेच त्यात त्रूटी असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर न्यायालयाने सुधारित पर्यावरण ना-हरकत प्रमाणपत्र घेणेबाबत आदेश दिले होते. तोपर्यंत महापालिकेने थेट पर्यावरणाशी संबधित कामे थांबविली होती, तसेच शासनाकडे सुधारीत ना हरकत प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल केला होता.
त्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणाच्या बैठकीत सुधारीत ना हरकत प्रमाणपत्रास मान्यता देण्यात आली. तर महापालिकेने तत्काळ हे प्रमाणपत्र एनजीटीमध्ये दाखल केले होते.
त्यावर नुकतीच सुनावणी झाली असून एनजीटीने हे प्रमाणपत्र मान्य केले असून यादवडकर यांची याचिका निकाली काढली आहे. त्यामुळे महापालिकेच्या या प्रकल्पातील पुढील कामांचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.
असा आहे प्रकल्प…
– ४४ कि.मी. नदीकाठ विकसन
– प्रकल्पाचा खर्च ४ हजार ७२७ कोटी
– ११ टप्प्यांत होणार काम
– संगमवाडी ते बंडगार्डन ८५ टक्के काम पूर्ण
– बंडगार्डन ते मुंढवा २७ टक्के काम पूर्ण





