Pimpri : नदी सुधारचा मार्ग मोकळा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने १ हजार ५५६ कोटी रूपये खर्च करून पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. अखेर, त्या प्रकल्पाला राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडून इन्व्हाॅयरमेन्टल क्लिअरन्स (पर्यावरण ना हरकत-ईसी) दाखला मिळाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पास गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित पर्यावरण व सिंचन विभागांशी समन्वय साधून वेळोवेळी आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली आणि प्रकल्पाची गरज अधिकृत स्तरावर मांडली.
शहराच्या मध्यातून पवना नदी वाहते. पवना धरणापासून नदी सुरू होऊन ती दापोडी येथे मुळा नदीत विसर्जित होते. पिंपरी-चिंचवड शहरात किवळे ते दापोडी असे दोन्ही बाजूचे पवना नदीचे पात्र आहे. नदीचे २४.४० किलोमीटर अंतर आहे. नदीकाठावर महापालिका, एमआयडीसी तसेच, एमसीसीआयएकडून सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्यात येत आहेत.
एसटीपीत प्रक्रिया केलेले पाणी पवना नदीत सोडले जाणार आहे. या नदीचा आराखडा बनवून राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडे डिसेंबर २०१९ ला पाठविण्यात आला होता. त्या विभागाने सुचविलेल्या अनेक त्रुटी दूर करून सुधारित आराखडा वेळोवेळी पाठविण्यात आला.
अखेर, पर्यावरण विभागाने सोमवारी (दि.७) महापालिकेस ईसी दाखला दिला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. नदीचे पाणी स्वच्छ होऊन, नदी काठ हरित करून सुशोभित केले जाणार आहेत. दरम्यान,मुळा नदीच्या वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंतच्या पहिल्या टप्पाचे काम सुरू झाले आहे. तसेच, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी ईसी दाखला पूर्वीच मिळाला आहे. पवना नदी प्रकल्पाच्या इसी प्रतीक्षा आता संपली आहे.
महत्त्वाच्या बाबी
पवना नदीतील सांडपाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी नवीन एसटीपी, ईटीपी उभारणार
औद्योगिक व घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी योजनांची अंमलबजावणी
84 नाल्यांमधून होणारे थेट प्रदूषण रोखण्याचे ठोस उपाय
18,455 नवीन झाडांचे वृक्षारोपण व जैवविविधतेचे जतन
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पवना नदी प्रकल्पास राज्य शासनाकडून ई.सी. दाखला मिळाल्याने हे काम आता सुरू करता येणार आहे. प्रकल्पाचा आराखडा तयार करून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. प्रकल्पासाठी आवश्यक निधीची तरतूद करून प्रत्यक्ष काम सुरू केले जाईल.
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता
ही फक्त मंजुरी नाही, तर पिंपरी-चिंचवड शहराच्या नद्यांसाठी नवजीवन देणारा निर्णय आहे. गेल्या काही वर्षांपासून मी सातत्याने प्राधिकरणांकडे यासाठी पाठपुरावा करत होतो. आता ही मंजुरी मिळाल्याने पवना नदी स्वच्छ व शुद्ध करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. लवकरच निधीसाठीही आपण अधिकृत स्तरावर पावले उचलणार आहोत.
– संदीप वाघेरे, माजी नगरसेवक.





