Pavel Durov : टेलिग्रामचे संस्थापक पॉवेल डोरोव्ह यांच्याविरुद्ध रशियामध्ये वॉरंट जारी
टेलिग्राम या मेसेजिंग ॲपचे संस्थापक आणि मालक पॉवेल डुरोव्ह (Pavel Durov) यांच्याविरोधात रशियाच्या देशांतर्गत सुरक्षेच्या प्रमुख एजन्सीने दहशतवादाला मदत केल्याच्या आरोपाखाली आंतरराष्ट्रीय वॉरंट बजावले आहे.

Pavel Durov : टेलिग्राम या मेसेजिंग ॲपचे संस्थापक आणि मालक पॉवेल डुरोव्ह (Pavel Durov) यांच्याविरोधात रशियाच्या देशांतर्गत सुरक्षेच्या प्रमुख एजन्सीने दहशतवादाला मदत केल्याच्या आरोपाखाली आंतरराष्ट्रीय वॉरंट बजावले आहे.
डुरोव्ह (Pavel Durov) हे जन्माने रशियाचेच नागरिक आहेत आणि त्यांच्या करिअरची सुरुवात देखील रशियामध्येच केली आहे. पण नंतर ते विदेशात स्थायिक झाले आहेत. ते स्थापक-मालक असलेल्या टेलिग्राम या ॲपला रशियामध्ये मोठी लोकप्रियता आहे.
रशियाने युक्रेनवर फेब्रुवारी २०२२ मध्ये आक्रमण केल्यापासून टेलिग्रामवर पुर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न रशियाकडून केला जातो आहे. युक्रेनच्या गुप्तचर एजन्सींकडून टेलिग्रामवर चालवल्या जात असलेली अनेक चॅनेल, चॅट आणि बोट्स हटवण्याची मागणी रशियाकडन दीर्घकाळापासून केली जाते आहे.
टेलिग्रामवरील ही चॅनेल युक्रेनच्या गुप्तचरांबरोबर रशियामध्ये मोठी जीवितहानी करण्यासाठी दहशतवादी आणि कट्टरवादी संघटनांचे घातपाताचे कट, सामूहिक हत्या आणि सायबर फसवणुकीचे गुन्हे करण्यासाठी मदत करत असल्याचाही आरोप केला जात होता. मात्र टेलिग्रामने ही चॅनेल न हटवल्यामुळे डुरोव्ह यांच्यावर दहशतवादाला मदत करण्याचा आरोप फेडरल सिक्युरीटी एजन्सीकडून ठेवण्यात आला आहे.
टेलिग्रामवर रशियाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी डेटिंग चॅटबोट चालवला जात असल्याचाही आरोप एजन्सीने केला आहे. या चॅटबोटवरील १२ ते २२ वर्षे वयोगटातील ४६ वापरकर्त्यांना २०२५ च्या जुलैपासून ताब्यात घेण्यात आले आहे.
रशियाकडून टेलिग्रामला नियंत्रित करण्यासाठी गुन्हेगारी स्वरुपाचा तपास सुरू केला गेला असून रशियाचा हा तपास अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधात असल्याचा आरोप डुरोव्ह (Pavel Durov) यांनी केला आहे. आरोपात दोषी आढळल्यास डुरोव्ह यांना रशियामध्ये आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते. डुरोव्ह यांना वॉन्टेड करण्याबाबत टेलिग्रामने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.






