टेलीग्रामवरील समाजविघातक, गुन्ह्याविषयक मजकूर काढून टाकण्यात अपयशी ठरल्याच्या कारणावरून या सोशल मीडिया व्यासपीठाचा संचालक पॉवेल डुरोव्ह याला ङ्ग्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. या अटकेने आता एक वादळ निर्माण झाले आहे. अभिव्यक्तीे स्वातंत्र्य आणि सरकारी सेन्सॉरशीपसंदर्भात वेळोवेळी चिंता व्यक्त करणार्या मंडळीत डुरोव्ह नायक म्हणून नावारुपास आले आहेत. डुरोव्हचे पाठीराखेही तितकेच वाढले आहेत. वास्तविक, टेलीग्रामला 31 देशांत तात्पुरत्या किंवा कायम स्वरुपात बंदीचा सामना करावा लागला आहे. आज टेलीग्राम जगभरातील एक अब्ज वापरकर्त्यांच्या हातात पोचत आहे. पण त्यावरुन प्रसारीत होणार्या मजकुरावर नियंत्रण व नियमनाचा अभाव आहे.
जवळपास दहा वर्षांपूर्वी रशियाने पॉवेल डुरोव्ह निर्मित सोशल मीडियावरील एक पेज बंद करण्याबाबत दबाव आणला होता. हे पेज विरोधी पक्षाच्या नेत्यांचे होते आणि ते ‘व्हीकाँटॅक्ट’ या ङ्गेसबुकच्या धर्तीवर सुरू झालेल्या एका सोशल मीडियावर बनवण्यात आले होते. रशियाच्या दबावाला डुरोव्हने ऑनलाईन विश्वातच परखडपणे उत्तर देत एक हुडी घातलेला आणि जीभ बाहेर काढणारा श्वान असलेला ङ्गोटो शेअर केला आणि ‘सोशल मीडियावर समुहांना ब्लॉक करण्याची मागणी करणार्या रशियाच्या गुप्तचर सेवांना अधिकृत प्रतिक्रिया’ असे लिहिले. हाच डुरोव्ह पुढे ‘टेलिग्राम’ या सोशल मीडियाचा मुख्याधिकारी आणि संस्थापक बनला. आता तेरा वर्षानंतर याच सत्ताविरोधी प्रवृत्तीमुळे डुरोव्ह अडचणीच्या नव्या स्थितीत ढकलला गेला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना टेलिग्रॅमवरील समाजविघातक, गुन्ह्याविषयक मजकूर काढून टाकण्यात अपयशी ठरल्याच्या कारणावरून ङ्ग्रान्समध्ये अटक करण्यात आली.
टेलिग्राम हे एक ऑनलाइन व्यासपीठ असून या माध्यमातून 2013 मध्ये त्याने सोशल मीडियाच्या जगात पाऊल टाकले. आज हे व्यासपीठ जगाच्या कानाकोपर्यात पोहोचले आहे. ङ्ग्रान्सचे अध्यक्ष इम्यॅनूएल मॅक्रॉन यांनी डुरोव्हच्या अटकेचा उल्लेख करत ङ्ग्रान्स हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी गंभीर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. वास्तविक कायद्याचे काटेकोर पालन करणार्या देशात सोशल मीडियावरचे जग आणि प्रत्यक्षातील जीवन या दोन्हीत दिसणार्या स्वातंत्र्याला मात्र कायद्याच्या चौकटीतच ठेवले जाते. डुरोव्हच्या अटकेने आता एक वादळ निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणजे अभिव्यक्तीे स्वातंत्र्य आणि सरकारी सेन्सॉरशीपसंदर्भात वेळोवेळी चिंता व्यक्त करणार्या मंडळीत डुरोव्ह नायक म्हणून नावारुपास आले आहे.
प्रामुख्याने जागतिक पातळीवर ऑनलाइन घडामेडींवरील देखरेख वाढलेली असताना डुरोव्हचे पाठीराखेही तितकेच वाढले आहेत. ‘एक्स’चे मालक एलॉन मस्क आणि एडवर्ड स्नोडेन यांनी डुरोव्हचा बचाव करण्यात पुढाकार घेतला आहे. यादरम्यान ‘एक्स’वर ‘ङ्ग्री पॉवेल’ या हॅशटॅगची सर्वत्र छाप पडली होती. या पार्श्वभूमीवर टेलिग्रॅमने जारी केलेल्या निवेदनात आपले माध्यम युरोपीय संघाच्या कायद्याचे पालन करते. आपले फ्लॅटङ्गॉर्म किंवा कंपनीचे पालक या फ्लॅटङ्गॉर्मच्या दुरुपयोगाबद्दल जबाबदार असल्याचा दावा बिनबुडाचा आहे, असे स्पष्टपणे सांगितले.
पावेल डुरोव्ह यांच्यासाठी वाद आणि कायदेशीर खटले या काही नवीन गोष्टी नाहीत. ‘टेलिग्राम’सारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यानंतर ते कोणत्या ना कोणत्या वादात सतत सापडले आहेत. टेलिग्राम हे दीर्घकाळापासून संस्थापक डुरोव्हच्या सत्ताविरोधी जनमताशी आणि स्वतंत्र अभिव्यक्तीशी नेहमीच कटिबद्ध राहिले आहे. या भूमिकेमुळेच टेलिग्राम हे रशिया, इराण, सत्ताधारी लोकांशी संबंधित राहणार्या अन्य लोकांसाठी एक लोकप्रिय चॅट अॅप म्हणून नावारुपास येण्यास मदत झाली. परंतु या प्लॅटङ्गॉर्मवर देखरेख न करण्याच्या डुरोव्हच्या दृष्टीकोनाने दहशतवादी, कट्टरपंथीय, शस्त्र तस्कर, गैरव्यवहार करणारे आणि अमली पदार्थाच्या तस्करांना आकर्षित केले. यासंदर्भातही टेलिग्राम असे म्हणते की, गोपनीयता ही ऑनलाइन अभिव्यक्तीवरील देखरेखीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.
अलिकडेच डुरोव्ह यांनी एका पोस्टमध्ये आपण 15 वर्षांत शुक्राणू दाताच्या रुपाने 12 देशांत शंभरपेक्षा अधिक जैविक मुलांना जन्म दिला असल्याचे म्हटले होते; मात्र डुरोव्हच्या अजेंड्यावर टेलिग्रामच राहिले आहे. 2014 मध्ये रशियाच्या सुरक्षा संस्थांची वाढती करडी नजर पाहता त्यांनी रशियाला सोडचिठ्ठी दिली अणि दुबईत बस्तान हलविले. सरकारने आपल्या व्यवसायात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका डुरोव्ह यांनी मांडली. यानंतरच त्यांचा कंटेंटवरील नियंत्रणासंदर्भात अॅपल आणि प्रमुख सरकारशी संघर्ष सुरू झाला.
टेलिग्रामला 31 देशांत तात्पुरत्या किंवा कायम स्वरुपात बंदीचा सामना करावा लागला आहे. डुरोव्हने टेलिग्रामच्या एका प्रोग्रॅमरला एङ्गबीआयने कामावर ठेवण्याच्या प्रयत्न केल्याचा आरोप केला. या आधारावर टेलिग्रामच्या वापरकर्त्यांच्या डेटापर्यंत सहजपणे पोहोचण्याचा अमेरिकन सरकारचा डाव असल्याचे डुरोव्ह यांचे म्हणणे होते. विशेष म्हणजे एङ्गबीआयने या आरोपावर कोणतेही उत्तर दिलेले नाही.
1984 मध्ये सोव्हियत रशियात जन्मलेले डुरोव्ह हे चार वर्षाचे असताना आपल्या कुटुंबीयांसह उत्तर इटलीत स्थलांतरित झाले. 1990 च्या दशकाच्या प्रारंभी सोव्हिएत रशियाचे पतन झाल्यानंतर ते सेंट पिट्सबर्ग येथे परतले. कॉलेजमध्ये एका मित्राने डुरोव्ह यांना ङ्गेसबुकची बाल्यावस्थेतील आवृत्ती दाखविली. मार्क झुकेरबर्ग या नवतरुणाने ङ्गेसबुकची पायाभरणी केली होती. या प्लॅटङ्गॉर्मपासून प्रेरणा घेत डुरोव्ह यांनी स्वत:चे सोशल मीडिया प्लॅटङ्गॉर्म तयार करण्याचा निर्धार केला. त्यांनी 2006 मध्ये ‘व्हीके’ची सुरुवात केली आणि काही काळातच हे माध्यम रशियात लोकप्रिय ठरले. एवढेच नाही तर क्रेमलिनचे देखील या माध्यमाने लक्ष वेधून घेतले. क्रेमलिनने ‘व्हीके’च्या वापरकर्त्यांची माहिती मागितली. तेथेच डुरोव्ह यांना रशियाच्या हेतूबद्धल शंका आली. डुरोव्ह यांच्या मते, 2011 च्या काळात रशियाच्या सुरक्षा दलाने त्यांच्या घराजवळ गस्त घालण्यास सुरुवात केंली तेव्हाच त्यांचे मनसुबे कळू लागले. त्याचवेळी डुरोव्ह यांनी टेलिग्रामची सुरुवात केली.
डुरोव यांचा अंदाज खरा ठरला. रशियन सरकारने त्यांना व्हीके वापरकर्त्यांचा डेटा द्यावा आणि देश सोडून जावे असा अल्टीमेटम दिला. रशियाशी नाते तोडल्यानंतर डुरोव्ह टेलिग्राम अभियंत्यांच्या घोळक्यात राहू लागले. डुरोव्ह यांनी काही महिने राहण्याची जागा सतत बदलत ठेवली. कधी बार्सिलोना, बाली, बर्लिन, हेलसिंकी तर कधी सॅन ङ्ग्रान्सिस्को अशी भटकंती करत काही काळ घालविला. डुरोव्ह यांच्याकडे संयुक्त अरब अमिराती आणि ङ्ग्रान्सचे नागरिकत्व आहे. अर्थात ते खासगी विमानाने प्रवास करतात, मात्र बाजारात जाण्यापासून ते लांब राहतात. जगभरात ङ्गिरण्यासाठी ते स्वत:च्या खात्यात कोटयावधी डॉलर आणि बिटक्वॉइन बाळगतात. ब्लूमबर्गच्या अंदाजानुसार त्यांची एकूण मालमत्ता नऊ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे.
टेलिग्राम आज जगभरातील एक अब्ज वापरकर्त्यांच्या हातात पोहोचले आहे. हा आकडा ‘एक्स’ला मागे टाकणारा आहे. टेलिग्रामचा वापर जसजसा वाढत गेला, तसतशी यातील कंटेटवरील देखरेख ठेवणाची डुरोव्ह यांची यंत्रणा किती कुचकामी आहे, याबाबत टीका होऊ लागली. धोरणकर्ते, कायद्याची अंमलबजावणी करणारे, सुरक्षा दले यांनी या निष्काळजीपणाबद्दल टेलिग्रामला अनेकदा इशारे दिले. हे अॅप चुकीची माहिती, दहशतवादाचा प्रसार, कट्टरपंथीय विचासरणीचा प्रसार, अमली पदार्थांच्या तस्करीसाठीचे संप्रेषण, चाइल्ड पोर्नोग्राङ्गी आणि बेकायदा शस्त्रविक्रेते यांचा अड्डा ठरला आहे, असे घणाघाती आरोप होऊ लागले.
चौकशीचा ससेमिरा असतानाही डुरोव्हने अनेक वर्षे सिलिकॉन व्हॅलीतील आपल्या साथीदारांप्रमाणेच शासकीय यंत्रणापासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी झुकेरबर्ग, गुगलचे सुंदर पिचाई, टिकटॉकचे शू च्यू यांना अमेरिकी संसदेसमोर बोलण्यासाठी पाचारण करण्यात आलेले होते. डुरोव्ह आणि त्यांच्या अभियंत्यांनी चालता बोलता ‘टेलिग्राम’ला सक्रिय ठेवले आणि अपडेट करत राहिले. एकदा तर ईशान्य आशियातील समुद्रात एका नौकेतून प्रवास करताना टेलिग्रामच्या अभियंत्यांनी हे अॅप अपडेट केले होते. गेल्या काही वर्षांत टेलिग्रामने बर्यापैकी वादग्रस्त मजकूर वगळला आहे. त्यात लैंगिंक शोषण किंवा हिंसेला चिथावणारी देणार्या पोस्टस्चा समावेश आहे. परंतु आजही या माध्यमाचा वापर अवैध कृत्यांसाठी मोठ्या प्रमाणावर होतो हे वास्तव आहे.
भारतातही याबाबत अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठीच्या नीट-यूजी 2024 परीक्षेचे पेपर ङ्गुटल्याचे प्रकरण बरेच गाजले. याबाबत बिहार, हरियाणा, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आदी राज्यांतून अनेकांची धरपकड झाली. या प्रकरणाच्या चौकशीत टेलिग्राम अॅपवरून ङ्गोडण्यात आलेल्या पेपरचं वितरण झाल्याची माहिती पुढे आली. पेपर ङ्गोडणार्या रॅकेटने किमान 700 विद्यार्थ्यांकडून 200 ते 300 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट ठेवले होते. अनेक विद्यार्थ्यांना टेलिग्रामवरूनच परीक्षेच्या दोन तास आधी प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या. टेलिग्रामवरूनच प्रश्नपत्रिकांचा ‘व्यवहार’ झाला होता. याखेरीज पायरसी उद्योगासाठीही टेलिग्राम साहाय्यभूत ठरले आहे. टेलिग्रामच्या असंख्य चॅनेलवर हॉलिवूड, साऊथ सिनेमे, इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये डब केलेले सिनेमे, नवे रिलिज झालेले पायरेटेड सिनेमे युजर्सना विनामूल्य डाऊनलोड करून बघता येतात.
पायरेटेड कंटेंटसोबतच पोर्नोग्राङ्गी, वुमन-चाइल्ड सेक्शुअल अब्युजींग कंटेंटही टेलिग्रामच्या वेगवेगळ्या चॅनेलवरून पसरवला जातो. टेलिग्रामचे काही चॅनेल तर असे आहेत ज्यावरून ड्रग्जची खरेदी-विक्रीही चालते. ह्युमन ट्रॅङ्गिकिंगचे व्यवहारही होतात. जुगाराच्या लिंक शेअर करून अनेकांना आर्थिक ङ्गसवणुकीच्या जाळ्यात ओढले जाते. खंडणीखोरी, हेट स्पीच, जातीय द्वेष, दहशतवादी कारवाया असे अनेक भयंकर उद्योग टेलिग्राम प्लॅटङ्गॉर्मचा वापर करून चालत असल्याचे अनेक देशांनी केलेल्या चौकशीत उघड झालंय.
गेल्या वर्षी केंद्राच्या माहिती तंत्रज्ञान आणि प्रसारण मंत्रालयाने ज्या सोशल मीडिया प्लॅटङ्गॉर्मना नोटीस जारी केल्या होत्या त्यात टेलिग्रामच्या नावाचाही समावेश होता. टेलिग्रामच्या युजर्सना सिक्रेट चॅटचा तसेच आपला नंबर लपवण्याचा पर्याय मिळतो. अशा एक ना अनेक पर्यायांमुळे गोपनीय काम करणार्यांमध्ये टेलिग्राम प्रसिद्ध होत गेले. डार्क वेबच्या विश्वातही टेलिग्राम यामुळेच लोकप्रिय आहे. गोपनीयतेच्या बाबतीत नेहमीच सजग असलेल्या युरोपियन युनियनने टेलिग्रामचे सीईओ पॉवेल दुरोव्ह यांना कंटेंटवर नियंत्रण ठेवण्याविषयी अनेकदा इशारे जारी केले होते, परंतु याकडे त्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. पण त्यामुळेच त्याला अटक करण्यात आली. या अटकेनंतर अद्याप तरी टेलिग्राम सुव्यवस्थित सुरू आहे. उद्याच्या भविष्यात काय होईल हे मात्र सांगता येणार नाही !
– महेश कोळी, संगणक अभियंता