Paul Stirling World Record : पॉल स्टर्लिंगने मोडला रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
Paul Stirling World Record : आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे

Paul Stirling World Record in T20I Cricket: आयर्लंडचा अनुभवी कर्णधार पॉल स्टर्लिंग याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. पुरुष क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा जागतिक विक्रम आता स्टर्लिंगच्या नावावर जमा झाला आहे. गुरुवारी दुबई येथे संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने हा पराक्रम रोहित शर्माचा विक्रम मोडला.
रोहित शर्माला टाकले मागे –
पॉल स्टर्लिंगचा हा १६० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना होता. या सामन्यासह त्याने भारतीय संघाचा माजी टी-२० कर्णधार रोहित शर्मा याचा १५९ सामन्यांचा विक्रम मोडीत काढला. रोहितने यापूर्वीच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असल्याने, स्टर्लिंग आता या यादीत बराच काळ अव्वल स्थानी राहण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक टी-२० सामने खेळणारे खेळाडू:
१. पॉल स्टर्लिंग (आयर्लंड): १६० सामने*
२. रोहित शर्मा (भारत): १५९ सामने
३. जॉर्ज डॉकरेल (आयर्लंड): १५३ सामने
४. मोहम्मद नबी (अफगाणिस्तान): १४८ सामने
५. जोस बटलर (इंग्लंड): १४४ सामने
धावांच्या शर्यतीतही अव्वल फळीत –
केवळ सामने खेळण्यातच नव्हे, तर धावा करण्याच्या बाबतीतही स्टर्लिंगने आपली छाप सोडली आहे. तो सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ३,८७४ (१ शतक आणि २४ अर्धशतके) केल्या आहेत. त्याचा बाबर आझम, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यानंतर क्रमांक लागतो.
फ्रँचायझी क्रिकेटमधील ‘पॉवर-हिटर’ –
Paul Stirling becomes the most capped player in T20I history 🙌#Cricket #PaulStirling #IrelandCricketTeam pic.twitter.com/IegfzPHuQj
— CricketTimes.com (@CricketTimesHQ) January 30, 2026
२००९ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या स्टर्लिंगला त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी जगभरात ओळखले जाते. त्याच्या याच कौशल्यामुळे त्याने आयपीएल सोडून जगातील जवळपास सर्वच मोठ्या लीगमध्ये (PSL, BPL, ILT20, SA20, द हंड्रेड) आपल्या फलंदाजीची जादू दाखवली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या २०१२ आणि २०१३ च्या वर्ल्ड टी-२० क्वालिफायर फायनलमधील त्याच्या खेळी आजही संस्मरणीय मानल्या जातात.





