Patna Lok Sabha Election : रविशंकर प्रसाद यांच्या विरोधात अंशुल रिंगणात

Patna Lok Sabha Election 2024 : कॉंग्रेस पक्षाने बिहारच्या पाटणा साहिब मतदार संघात अंशुल अविजित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद या मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात आता अंशुल कॉंग्रेसतर्फे लढत देणार आहेत. अंशुल यांची ओळख म्हणजे ते लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांचे पुत्र आहेत.
बिहारमध्ये कॉंग्रेसच्या वाट्याला ज्या जागा आल्या आहेत त्यातील काही जागांवर त्यांनी ज्येष्ठ नेत्यांना, काही जागांवर नव्या चेहऱ्यांना तर काही जागांवर इतर पक्षातून दाखल झालेल्यांना संधी दिली आहे. मात्र त्यावरूनही पक्षात नाराजी असून जुने कार्यकर्ते उमेदवारीच्या निकषांबद्दल शंका उपस्थित करत आहेत.
लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार बिहारच्या सासाराम येथून कायम निवडणूक लढवत आल्या आहेत. यावेळी त्या रिंगणात नाहीत तर त्यांच्या मुलाला संधी दिली गेली आहे. अंशुल कॉंग्रेसचे प्रवक्तेही आहेत. मीरा कुमार यांनी चार वेळा सासारामचे प्रतिनिधीत्व केले आहे. तेथून कॉंग्रेसने मनोज कुमार यांना तिकिट दिले आहे.
कुमार मागच्या वेळेची निवडणूक बहुजन समाज पक्षाकडून लढले होते. काही काळासाठी ते मुकेश साहनी यांच्या विकासशील इंन्सान पार्टीमध्येही होते. दरम्यान, कॉंग्रेसने महाराजगंज लोकसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांचे पुत्र आकाश प्रसाद सिंह यांना उमेदवारी दिली आहे.





