साताऱ्यात जंबो रुग्णालयामध्ये रुग्णांच्या नोंदी साध्या कागदावर

सातारा : सातारा जंबो कोविड हॉस्पिटल्सची अंर्तगत वैद्यकीय सेवा कितीही दर्जेदार असली तरी बेड मिळविण्यासाठी रूग्णाच्या नातेवाइकांना प्रचंड आटापिटा करावा लागत आहे. रुग्णालयाच्या रिसेप्शनवर रुग्णांच्या नोंदी रजिस्टरवर न घेता केवळ साध्या कागदावर घेतल्या जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. काही सामाजिक संघटनांनी लक्ष वेधल्यावर हा प्रकार समोर आला आहे.
केंद्रीय आरोग्य समितीने स्पष्ट सूचना करूनही जिल्हा रुग्णालय व जंबो हॉस्पिटलमध्ये बेडची उपलब्धता दर्शविणारा डॅश बोर्ड उभारण्यात न आल्याने आरोग्य यंत्रणेचा ढिसाळपणा समोर आला आहे. सातारा जंबो हॉस्पिटल्समध्ये बेडसाठी ऍडमिशन मिळवताना रुग्णांना अक्षरशः टाचा घासाव्या लागत असून रुग्णांवर तडफडून जीव सोडण्याची वेळ येत आहे .
रूबी एल केअरची सेवा आतून कितीही सक्षम असली तरी रिसेप्शन काउंटरवरून वॉर्डमध्ये पोहचणे रूग्णांना दुरापास्त झाले आहे. दररोज येथे दाखल होण्यासाठी रुग्णांच्या नोंदी रजिस्टर सोडून केवळ साध्या कागदावर नोंदविल्या जात आहेत. याची तक्रार काही सामाजिक संस्थांनी केल्यानंतरही आरोग्य यंत्रणा अनास्थेचं कातडं डोळ्यावर पांघरून बसली आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल अकरा रुग्ण येथे बेड न मिळाल्याने माघारी गेल्याची माहिती आहे. रिसेप्शनवरचा सावळा गोंधळ तर न समजण्याच्या पलीकडचा आहे.
रूग्णांच्या नातेवाइकांना 1 ते 10 क्रमांकाचे टोकन दिले जातात. मात्र, ऍडमिशनसाठी मात्र चार तासाच्या वेटिंगचा मनस्ताप सोसावा लागतो. काही ऍडमिशनही वशिलेबाजीतून मागच्या दाराने होत असल्याच्या प्रतिक्रिया काही रुग्ण व सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. जंबोच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवणारे नोडल ऑफिसर जिल्हा रुग्णालयाचे डॉ. सुधीर बक्षी त्यांच्या जबाबदारीत पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
रोज रात्री एक राउंडचा सोपस्कार म्हणजे जंबोचे नियंत्रण नव्हे हे त्यांना सांगण्याची वेळ आली आहे. रूबी एल केअरचे प्रमुख डॉ. भाऊसाहेब पवार तर कधीच कोणाच्या संपर्कात नसतात. त्यामुळे व्यवस्थापनातल्या त्रुटी किंवा बदल यावर कोणताच प्रकाश पडत नाही.
केंद्रीय समितीच्या सूचनेला केराची टोपली
बेडची संख्या डिजिटली दर्शविणारा डॅश बोर्ड जंबो काय किंवा सिव्हिल काय, कोठेही उभारला गेलेला नाही. केंद्रीय आरोग्य समितीच्या सूचनेला जिल्हा आरोग्य यंत्रणेने फारसा भाव दिला नसल्याचे स्पष्ट झाले. जंबोमध्ये चालणाऱ्या व्हीआयपी वशिलेबाजीचा सातारकरांना प्रचंड मनस्ताप होत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी झाडाझडती घेऊनही जंबोच्या खासगी प्रशासनामध्ये कसलाही फरक पडलेला नाही. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आता फिल्डवर येऊन काम करण्याची गरज आहे. मात्र, आरोग्य यंत्रणा सुस्तपणे कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप प्रकर्षाने होऊ लागला आहे.





