Pathum Nissanka Catch : आधी सोपा कॅच सोडला, मग हवेत झेप घेत टिपला चित्तथरारक झेल! निसांकाच्या ‘सुपरमॅन’ कामगिरीने मॅक्सवेल अवाक
Pathum Nissanka Catch : श्रीलंकेच्या पथुम निस्सांकाच्या नावाचाही समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 'ग्रुप बी' च्या निर्णायक सामन्यात निस्सांकाने मैदानात अशी काही किमया केली की, ज्याने प्रेक्षकांसह समालोचकही चकीत झाले.

Pathum Nissanka Catch Video Viral : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सध्या एकाहून एक सरस झेल पाहायला मिळत आहेत. यामध्ये आता श्रीलंकेच्या पथुम निस्सांकाच्या नावाचाही समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील ‘ग्रुप बी’ च्या निर्णायक सामन्यात निस्सांकाने मैदानात अशी काही किमया केली की, ज्याने प्रेक्षकांसह समालोचकही चकीत झाले. विशेष म्हणजे, काही क्षणांपूर्वी एक सोपा झेल सोडल्यानंतर त्याने स्पर्धेतील सर्वोत्तम झेल टिपत आपल्या चुकीची भरपाई केली.
एकाच सामन्यात दोन टोकांचे अनुभव –
सोमवारी पल्लेकेलेच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करत होती. मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेडच्या फटकेबाजीनंतर ग्लेन मॅक्सवेल आणि जॉश इंग्लिस श्रीलंकेसाठी डोकेदुखी ठरत होते. अशा वेळी १६ व्या षटकात दुष्मंता चमीराच्या चेंडूवर मॅक्सवेलने हवेत फटका मारला. पथुम निस्सांका चेंडूच्या खाली अगदी व्यवस्थित उभा होता, पण हा सोपा झेल त्याच्या हाताला लागून निसटला. या चुकीमुळे श्रीलंकेचे चाहते प्रचंड नाराज झाले होते.
हवेत झेप घेतली अन् खेळ पालटला!
यानंतर स्वतःवरचा विश्वास न गमावता निस्सांकाने पुढच्याच षटकात इतिहास रचला. १७ व्या षटकात फिरकीपटू दुशान हेमंताच्या पहिल्याच चेंडूवर मॅक्सवेलने आक्रमक ‘रिव्हर्स स्वीप’ मारला. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या वरून अत्यंत वेगाने सीमापार जाणार असे वाटत असतानाच, तिथे तैनात असलेल्या निस्सांकाने आपल्या डाव्या बाजूला हवेत ‘सुपरमॅन’सारखी लांब झेप घेतली.
𝐍𝐨 𝐜𝐚𝐩𝐞 𝐧𝐞𝐞𝐝𝐞𝐝 😌
Pathum Nissanka defies gravity with an absolute screamer to dismiss Maxwell! 🤯
ICC Men’s #T20WorldCup | #SLvAUS | LIVE NOW ➡️https://t.co/J53l5oud0B pic.twitter.com/n7nMhQvtiZ
— Star Sports (@StarSportsIndia) February 16, 2026
चेंडूचा वेग इतका प्रचंड होता की, झेल लपकत असताना निस्सांकाचे हात त्याच्या शरीराच्या मागे गेले होते. या ‘इलेक्ट्रिक’ कॅचमुळे ग्लेन मॅक्सवेलला अवाक् होऊन माघारी तंबूत परतावे लागले. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सुपर-८ साठी निर्णायक कामगिरी –
पथुम निस्सांकाच्या या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे सेट झालेल्या मॅक्सवेलची खेळी संपुष्टात आली आणि श्रीलंकेला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. ग्रुप बी मधील सुपर-८ राउंडची शर्यत सध्या अत्यंत अटीतटीची असून निस्सांकाचा हा झेल सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला आहे.






