Patas News : पाटसमध्ये संतापजनक प्रकार! आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक स्तंभाची तोडफोड; परिसरात तणाव
Patas News : अज्ञात व्यक्तींकडून इलेक्ट्रॉनिक फलकाचे नुकसान; सोमनाथ खोमणे आणि समाज बांधवांनी काढला पोलीस चौकीवर मूक मोर्चा.

Patas News – दौंड तालुक्यातील पाटस येथील मुख्य रस्त्यावर गाव प्रवेश द्वारालगत असलेल्या आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक स्तंभावर असलेल्या विद्युत रोषणाई करण्यात आलेल्या फलकाची अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना शनिवार, दि.२८ रोजी पहाटे घडली आहे. दरम्यान, जय मल्हार क्रांती संघटना, समाज बांधव आणि ग्रामस्थांच्या वतीने पाटस पोलीस चौकीवर मूक मोर्चा काढत संबंधित समाजकंटावर कारवाईच्या मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहितीनुसार, पाटस येथल मुख्य प्रवेशद्वारालगत असलेल्या जुना बाजार तळ याठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या क्रांती स्तंभावर लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक फलकावर तसेच जय मल्हार क्रांती संघटनेच्या नावाचा फलकावर ही काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून नुकसान केल्याची घटना शनिवारी (दि २८) सकाळी जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सोमनाथ दादासाहेब खोमणे यांच्या निदर्शनास आली.
ही घटना समजताच समाज बांधव आणि जय मल्हार क्रांती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्तंभाजवळ एकत्र आले. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घटनेची माहिती मिळतात पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गाडेकर, पोलीस हवालदार जालिंदर बंडगर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली.
पोलिसांनी तात्काळ समाज बांधवांना विश्वासात घेऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेची तपासणी केली. मात्र, ही घटना सीसीटीव्ही कॅमेरेत चित्रीत झाली नसल्याने शोध घेणे अवघड झाले. या घटनेचा निषेध म्हणून जय मल्हार क्रांती संघटनेचे नेते बापूसाहेब खोमणे, जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष दादासाहेब खोमणे, उपसरपंच बाबा कोळेकर यांच्यासह समाज बांधव आणि ग्रामस्थांनी पाटस पोलीस मूक मोर्चा काढत पोलिसांना निवेदन दिले.
याप्रसंगी सत्वशील शितोळे, पंचायत समिती सदस्य शिवाजी ढमाले यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे समाज विघातक कृत्य करणाऱ्या आणि महापुरुषांची बदनामी आणि विटंबना करणाऱ्यांवर पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घ्यावे, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, पाटस पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ परिसरातील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेची तपासणी करून पाहणी केली. समाज बांधवांना विश्वासात घेऊन समजावून सांगत परिस्थिती आटोक्यात आणली आहे. संबंधितांवर चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी पोलिसांनी उपस्थित समाज बांधवांना दिले. या घटनेच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटनेने रविवारी (दि २९ ) पाटसगाव बंद करण्याची हाक दिली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत
पाटस ग्रामपंचायत प्रशासनाने मुख्य रस्त्यावर व मुख्य चौकात ठिकठिकाणी लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र, सध्या अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत धुळ खात पडले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गावच्या परिसरावर व अनुचित घटनांवर नजर ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
त्यातच पाटस परिसरात चोरीचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांनाही तपास करणे व आरोपींचा शोध घेणे अवघड झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करून हे कॅमेरे चालू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.






