पाटणचा एकात्मिक बाल विकास प्रकल्प “कुपोषित’

सूर्यकांत पाटणकर
पाटण –पाटण तालुका पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाला कामचुकार महिला अधिकाऱ्यांमुळे घरघर लागली आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पाटण तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे काम असमाधानकारक होत आहे. अंगणवाडी तपासणीच्या नावाखाली कार्यालयाला दांड्या मारणार्या प्रभारी महिला प्रकल्प अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तालुक्यात तब्बल 331 बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे.
दुर्गम डोंगराळ असणाऱ्या पाटण तालुक्यात 755 अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवून त्यांचा कारभार सुधारून कुपोषण, महिला बाल विकास, पोषण आहार, कुपोषित बालके याबाबत जागृती करून या घटकांचा स्तर उंचावण्याचे काम एकात्मिक बालविकास प्रकल्पाकडून करण्यात येते. शून्य ते सहा वयोगटातील मुलांना पोषण आहार विषयक व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे, मुलांच्या शारीरिक व योग्य मानसिक सामाजिक विकासासाठी पाया घालणे, बालमृत्यू बालरोग कुपोषण व शाळेतील गळती यांचे प्रमाण कमी करणे, मातांना पोषण आहार व आरोग्य शिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढवणे, धोरण निश्चिती व अंमलबजावणी यासारखी कामे एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकार्यांची असतात. मात्र, पाटण तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या महिला अधिकारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत. अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याशी उद्धट वर्तन करणे तसेच अंगणवाडी तपासणीच्या नावाखाली कार्यालयाला दांड्या मारणे, अधिकारी आहे म्हणून कार्यालयात उशिरा येणे असे प्रकार सध्या पाटण एकात्मिक बाल विकास प्रकल्पात सुरू आहेत.
तालुक्यात प्रकल्प एक व प्रकल्प दोन अशी विभागणी करण्यात आलेली आहे. पंचायत समितीच्या अखत्यारीत येणार्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकारी या रजेवर असल्याने या ठिकाणी प्रभारी अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र, एकात्मिक बालविकास प्रकल्पातील अधिकार्यांवर वरिष्ठांचा अंकुश नसल्याने सध्या पाटण पंचायत समितीचा एकात्मिक बालविकास प्रकल्पाला घरघर लागली आहे यापूर्वी एकात्मिक बालविकास प्रकल्पाची प्रतिमा डागाळलेली होती.त्यामुळे सध्या कार्यरत असणार्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा असताना प्रकल्प अधिकाऱ्यांना स्वतःच्या कर्तव्याची जाणीव नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारी पाटणच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कार्यालयात सकाळी 11 वाजताच शुकशुकाट दिसून आला. प्रकल्पाचे अधिकारी कार्यालयात हजर नव्हते.
याबाबत चौकशी केली असता मॅडम अजून आल्या नसल्याचे सांगण्यात आले. कार्यालयातील लेखनिक वगळता इतर कर्मचारी अधिकारीही कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे पाटणचा एकात्मिक बालविकास प्रकल्पाची अवस्था ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच झाली आहे. तालुक्यात 83 बालके कुपोषित असून 248 बालके मध्यम कुपोषित आहेत. तर एकूण 14 हजार 424 बालकांपैकी केवळ 7579 अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. आरोग्य तपासणीचे काम 50 टक्के झाले असून अद्यापही विद्यार्थी आरोग्य तपासणीच्या प्रतिक्षेत आहेत. एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची अवस्था दयनीय झाली असून केवळ तोरा मिरवण्याचे काम सध्या या प्रकल्पात सुरू असून यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे
वरिष्ठांचे दुर्लक्ष…
पाटण पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाचा कारभार जुन्या पंचायत समितीमधून होत होता. मात्र, त्या ठिकाणी तहसील कार्यालय आल्याने सध्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाचा कारभार पंचायत समितीच्या सभापती निवासामध्ये सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांचे या विभागाकडे दुर्लक्ष झाले आहे. याचा गैरफायदा घेत येथील प्रभारी अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर नसतील तर त्यांना अनधिकृत गैरहजर राहिल्यास मला शोकॉज नोटीस काढावे लागेल. परंतु, या प्रकाराची मी माहिती घेतो त्यानंतर कारवाई करण्यात येईल.
– गोरख शेलार
(गटविकास अधिकारी पंचायत समिती पाटण).
===================





