कोयनानगर : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात दोन वर्षापासून रान पेटवणारे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांना पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी असलेल्या शरद पवार पक्षाचे नेते जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांचा पत्ता कट झाला आहे. पाटणकर गटाने पालकमंत्री देसाई यांच्याविरोधात जोरदार तयारी केली असल्याने सत्यजित पाटणकर या निवडणुकीतून माघार न घेता अपक्ष लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पाटण तालुक्यात देसाई व पाटणकर या पारंपरिक विरोधकांत राजकीय लढाई होते. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासुन दोन्ही गटांकडून आरोप- प्रत्यारोप सुरू होते. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या तापलेल्या वातावरणात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी जनआक्रोश मोर्चा काढून रंग भरला होता. मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभे करणारे बलाढ्य पालकमंत्री शंभुराज देसाई यांचे असणारे आव्हान महाविकास आघाडीतून कोण पेलणार याबाबत प्रश्नचिन्ह होते. ठाकरे गटाकडून तसेच सत्यजीत पाटणकर यांचाही या उमेदवारीवर दावा होता. महायुतीने मंगळवारी उमेदवारी जाहीर करून शंभूराज देसाई यांना येथे उतरवले आहे. ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे. ठाकरे गटाने आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीत हर्षद कदम या निष्ठावंत शिवसैनिकाच्या निष्ठेचा सन्मान केला आहे. पाटणकरांनी देसाई यांच्या विरोधात रान पेटवले असल्याने महाविकास आघाडीतून तिकीट न मिळाल्याने ते माघार घेणार नसल्याचे पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यामधून बोलले जात आहे. ते अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याने पाटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.