“वंदे भारत’कडे प्रवाशांची पाठ’; तीन महिन्यांतच प्रवाशांच्या संख्येत मोठी घट

मुंबई – देशभरात अनेक शहरांमध्ये मोठ्या दिमाखात “वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या ओहत. तसेच मुंबई-सोलापूर प्रवाश जलद करण्यासाठी सोलापूर रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई अशी “वंदे भारत’ एक्स्प्रेस 11 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आली. पण तीन महिन्यांतच प्रवाशांनी या रेल्वेगाडीकडे पाठ फिरवली आहे. यामुळे रेल्वेला 56.3 टक्केच कमाई झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
सोलापूरहून मुंबईपेक्षा पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. वंदे भारत एक्स्प्रेसनंतर अर्ध्या तासांच्या फरकानंच हुतात्मा एक्स्प्रेस ही सोलापूरहून पुण्यासाठी सुटते. या गाडीने आम्ही तासाभराच्या फरकाने पुण्याला पोहचतो. त्याचबरोबर याचे तिकीटही “वंदे भारत’पेक्षा बरंच कमी आहे. त्यामुळे आम्ही नेहमीच्या हुतात्मा एक्स्प्रेसला पसंती देतो, अशी प्रतिक्रिया या मार्गावरील नियमित प्रवाशांनी दिली.
11 फेब्रुवारी 2023 ते 25 एप्रिल 2023 या कालावधीमधील 64 फेऱ्यांची आकडेवारी जाहीर झाली आहे. या काळात चेअर कार आणि एक्सिक्युटिव्ह कार यांच्यात अनुक्रमे 65536 आणि 6656 असे 72192 प्रवाशांनी बुकिंग केले. सोलापूरनंतरच्या कुर्डुवाडीमध्ये स्टॉप आहे. या ठिकाणाहून एका फेरीसाठी पुणे आणि मुंबईला 10 ते 20 पॅसेंजरच प्रवास करत आहेत.
या फेऱ्यांच्या कालावधीमध्ये “वंदे भारत’ला 8,99,09,760 इतकं उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात 5,06,20,254 इतकंच उत्पादन मिळाले आहे. या कालावधीमधील आकडेवारीनुसार चेअर कार आणि एक्झिक्यूटिव्ह कार मार्फत अनुक्रमे 87.09 आणि 76.6 टक्के बुकिंग झाली आहे.या संपूर्ण आकडेवारीनुसार सोलापूर-मुंबई दरम्यान “वंदे भारत’ एक्स्प्रेस मार्फक रेल्वे विभागाला 56.03 टक्के उत्पन्न मिळाले आहे.
“शिर्डी-मुंबई’लाही अल्पप्रतिसाद
शिर्डी येथे राज्यभरातून साईभक्त दर्शनासाठी येत असतात. साईभक्तांसाठी मुंबई ते साईनगर-शिर्डी “वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र, या रेल्वेला शनिवार आणि रविवार वगळता अन्य दिवशी अल्पप्रतिसाद मिळत आहे. “वंदे भारत’च्या चेअर सीटसाठी 840 रुपये,
तर एक्झिक्युटिव्ह कोचमधील सीटसाठी तब्बल 1,670 रुपये मोजावे लागतात. तसेच केटरिंगसह तिकिट घेतल्यास चेअर कारसाठी 975 रुपये, तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 1,840 रुपये दर आहे. दुसरीकडे दादर-शिर्डी एक्स्प्रेसला स्लीपर सीटसाठी केवळ 255 रुपये तिकीट आहे.





