पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०.५ कोटींच्या ‘हायड्रोपोनिक वीड’सह प्रवासी अटक

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर पुणे कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाला १०.५ कोटी रुपये किमतीच्या ‘हायड्रोपोनिक वीड’ (मारिजुआना) सह अटक केली आहे. संशयास्पद हालचालींमुळे या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले होते, त्याच्याकडून सुमारे १०.४७ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
एअर पुणे कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनय अमरनाथ यादव असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. तो इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E-1096 ने २४ जुलै २०२५ रोजी बँकॉकहून पुण्यात दाखल झाला होता. तपासणीदरम्यान त्याच्याकडे आढळलेल्या हायड्रोपोनिक वीडची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे १०.५ कोटी रुपये आहे.
या प्रकरणी एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्स्टन्सेस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कस्टम्स विभागाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





