Pune Crime : दहशत माजविण्यासाठी देशी पिस्तूल बाळगणारा तरुण जेरबंद; पर्वती पोलिसांची कारवाई
Pune Crime : पुण्यातील पर्वती परिसरात देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त.

Pune Crime : परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला पर्वती पोलिसांनी शिताफीने अटक केली. अनिकेत बापू कसबे (वय २५, रा. राजीव गांधी नगर, नेर्लेकर हॉस्पिटलजवळ, दांडेकर पूल, पर्वती पायथा, पुणे; सध्या रा. साई सिद्धी चौक, प्रेरणा शाळेजवळ, आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पर्वती पोलिसांचे तपास पथक २६ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अमोल दबडे, अमित चिव्हे आणि रणजित घाटगे यांना आरोपी अनिकेत कसबे याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राऊत यांनी या माहितीची खातरजमा करून पथकासह सापळा रचला. त्यानंतर आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी दोन्ही मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७४/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राऊत, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खिलारी, पोलीस हवालदार प्रकाश मरगजे, पोलीस अंमलदार अमोल दबडे, अमित चिव्हे, रणजित घाटगे, स्वप्निल घुगे, मनोज बनसोड, राकेश सुर्वे, सूर्या जाधव, गणेश तरंगे आणि मारुती तांदळे सहभागी झाले होते.





