पिंपरी | दिल्लीतील मोर्चात शहरातील वकील व कार्यकर्त्यांचा सहभाग

पिंपरी, (प्रतिनिधी) – दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील महमुद प्राचा, भानु प्रताप व प्रशांत भुषण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या “ई.व्ही.एम. हटवा, देश वाचवा” मोर्चामध्ये पिंपरीतील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सभासद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधी विभाग, शहर सचिव ॲड. नितीन क्षीरसागर व पिंपळे सौदागर येथील बांधकाम उद्योजक व्यंकट जाधव यांनीही सहभाग नोंदवलेला होता.
परंतू, किसान आंदोलनामुळे दिल्ली परिसरात कलम १४४ प्रमाणे जमावबंदी लागु केल्याने, जवळपास २०० वकील व मोर्चात सहभागी झालेल्या इतर आंदोलकांना अटक करून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.
त्यापैकी शहरातील व इतर काही आंदोलकांना दिल्ली येथील संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. त्यापैकी कोलकाता येथून अंजन चकवर्ती, दिल्लीतील स्थानिक सुरेश सभरवाल व शेतकरी मोर्चातील सुमीत चिकारा आणि अकम अन्सारी या आंदोलकांनी देखील सहभाग नोंदवलेला होता. त्यानंतर रात्री सर्वांना फौजदारी प्रकिया संहिता कलम ४६ अ (१) अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले.
मनसे विधी विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. किशोर शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अरुण लंबुगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चात शहर सचिव, विधीज्ञ नितीन क्षीरसागर सामिल झाले होते.





