Satara: दोन सराव परीक्षांसाठी ३ हजार ९०० विद्यार्थ्यांचा सहभाग
Satara जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील विद्यार्थ्यांची कामगिरी अधिक चांगली व्हावी, यासाठी मुख्य परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध सराव मिळावा, या उद्देशाने या परीक्षांचे आयोजन झाले. या अनुषंगाने पहिली सराव परीक्षा दि. ३ ऑक्टोबर रोजी झाली. पहिल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ तसेच ओएमआर उत्तरपत्रिका भरण्याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन दुसरी सराव परीक्षा दि. ३१ ऑक्टोबर रोजी झाली.

Satara: जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दि. २८ नोव्हेंबर रोजी होणार असून मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा परिषद आणि ओपन लिंकस पाउंडेशन पुणे विनोबा टीम यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या दोन जेएनव्ही सराव परीक्षांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या दोन्ही परीक्षांमध्ये सुमारे ३ हजार ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील विद्यार्थ्यांची कामगिरी अधिक चांगली व्हावी, यासाठी मुख्य परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध सराव मिळावा, या उद्देशाने या परीक्षांचे आयोजन झाले. या अनुषंगाने पहिली सराव परीक्षा दि. ३ ऑक्टोबर रोजी झाली. पहिल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ तसेच ओएमआर उत्तरपत्रिका भरण्याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन दुसरी सराव परीक्षा दि. ३१ ऑक्टोबर रोजी झाली. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेच्या स्वरुपाचा अनुभव, प्रश्नपत्रिका सोडविताना वेळेचे नियोजन, प्रश्नांची योग्य निवड आणि ओएमआर उत्तरपत्रिका अचूक पद्धतीने भरण्याचा सराव मिळाला. मुख्य परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास या परीक्षांची मदत होणार आहे. सराव परीक्षांतून विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी, प्रश्न सोडविण्याचा वेग आणि अडचणीचे घटक ओळखण्यास मदत झाली. परीक्षेच्या निकालाचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार पुढील काळात शिक्षकांच्या माध्यमातून आवश्यक सराव व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले,शिक्षण, अर्थ व क्रीडा समिती सभापती सौ. तेजस्विनी कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी हणमंत यादव, सन्मती देशमाने, विस्तार अधिकारी संभाजी कानवटे, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच ओपन लिंकस फाउंडेशन पुणे विनोबा टीमचे सातारा जिल्हा प्रोजेक्ट ऑफिसर योगेश जगताप यांनी नियोजन केले.





