Parshuram Wadekar – विद्यार्थी चळवळीपासून सामाजिक, राजकीय संघर्षाचा दीर्घ अनुभव गाठीशी असलेले परशुराम बाळकृष्ण वाडेकर यांची पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. पहिल्याच महापालिका निवडणूक लढविल्यानंतर त्यांना उपमहापौरपदाची संधी मिळाली आहे. याच महापालिकेत वाडेकर यांनी अनेक मोर्चे आणि आंदोलने केली आहेत.वाडेकर यांचा जन्म १ फेब्रुवारी १९६८ रोजी बोपोडी येथील कै. संजय गांधी रुग्णालयात झाला. बालपण आणि शिक्षणकाळ सिद्धार्थनगर, मुंबई- पुणे रस्ता, दापोडी परिसरात गेला. त्यांच्या आई लक्ष्मीबाई बाळकृष्ण वाडेकर, तर वडील बाळकृष्ण शिवराम वाडेकर आहेत.विद्यार्थिदशेपासूनच सामाजिक प्रश्नांशी जोडले गेलेले वाडेकर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या नामांतर चळवळीत सक्रिय सहभागी होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी तुरुंगवासही भोगला. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या माध्यमातून शिव- फुले-शाहू- आंबेडकरी विचारधारेच्या चळवळीत ते सातत्याने कार्यरत राहिले.२००२ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत तत्कालीन पर्यटन राज्यमंत्री कै. चंद्रकांत छाजेड यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यानंतर पुढील तीन विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी आपला सहभाग नोंदवला. राजकीय वाटचालीसोबतच सामाजिक वारसा जपण्यासाठी त्यांनी पुरोगामी संघटनांच्या माध्यमातून आंदोलनांचे नेतृत्व केले. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेच्या ‘भिडेवाडा’ला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. २०१७ मध्ये झालेल्या पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनीता वाडेकर या बोपोडी-औंध प्रभाग क्रमांक ८ मधून सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. त्या वेळी त्यांनी उपमहापौरपदाची जबाबदारी सांभाळली होती. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत परशुराम वाडेकर स्वतः बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून विजयी झाले. पहिल्याच प्रयत्नात उपमहापौरपदाची संधी मिळाल्याने सामाजिक चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्याचा सभागृहातील प्रवास अधिक ठळकपणे पुढे आला आहे.