Parli : मंजूर पांदण रस्त्याचे काम रखडल्याने दगडवाडी ग्रामस्थ आक्रमक; आमरण उपोषण सुरू
Parli : परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दगडवाडी येथील दगडवाडी ते सटवई पांदण रस्त्याचे काम मंजुरीनंतरही प्रत्यक्षात सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Parli : परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दगडवाडी येथील दगडवाडी ते सटवई पांदण रस्त्याचे काम मंजुरीनंतरही प्रत्यक्षात सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी २३ जूनपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनही सादर केले आहे. दगडवाडी ते सटवई पांदण रस्त्यास मंजुरी मिळून सुमारे दोन वर्षांचा कालावधी लोटला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक सूचना देऊनही कामास सुरुवात झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या रस्त्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याच्या जमिनीचे संपादन करण्याची आवश्यकता नसतानाही काम जाणीवपूर्वक रखडविण्यात येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. खराब रस्त्यामुळे ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, वाहतुकीसाठी मोठी गैरसोय होत असल्याचेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.
निवेदनात ग्रामस्थांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, या रस्त्याच्या कामासाठी रोजगार सेवकामार्फत सुमारे 5 लाख 29 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्त्याचे कोणतेही काम झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. रोजगार सेवकांनी प्रत्यक्ष काम न करता देयके काढल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दगडवाडी ते सटवई पांदण रस्ता मूळ मंजूर ठिकाणाऐवजी दुसऱ्याच ठिकाणी करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. २३ जूनपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून, प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.





