Newasa News : बेलापूर (श्रीरामपूर) ते परळी रेल्वे मार्गाला केंद्र सरकारकडून तात्काळ मंजुरी मिळावी या मागणीसाठी कुकाणा (ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर) येथे रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला बुधवारी दहा दिवस पूर्ण झाले. उपोषणकर्त्यांपैकी एकाला कमालीचा अशक्तपणा आणि भुरळ येत असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचारासाठी नगर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तालुका प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. दीपक डिंबर यांनी याबाबत नेवासे पोलीसांना पत्र देऊन माहिती दिली. डॉ. डिंबर यांनी सांगितले की, उपोषणकर्त्यांची प्रकृती खराब झाल्याने खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. उपोषणाची पार्श्वभूमी रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष रितेश विजयकुमार भंडारी, रज्जाक निजामशा इनामदार आणि सुरेश वसंतराव नरवणे यांनी ९ फेब्रुवारी २०२६ पासून कुकाणा ग्रामपंचायत प्रांगणात हे आमरण उपोषण सुरू केले आहे. हा रेल्वे मार्ग तब्बल १०० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असून, अलीकडे केंद्र सरकारकडून त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू झाले. बुधवारी उपोषणाचा १०वा दिवस सुरू असताना आंदोलकांना अशक्तपणा आणि चक्कर येत असल्याची माहिती मिळाल्याने डॉ. दीपक डिंबर, डॉ. कैलास कानडे आणि आरोग्य पथकाने उपोषणस्थळी जाऊन तपासणी केली. प्रकृतीची चिंता लक्षात घेता एका उपोषणकर्त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की, मंजुरीचे पत्र मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील. आता एका आंदोलकाला रुग्णालयात दाखल केले असले तरी, कुकाणा ग्रामस्थांनी तेथेच साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषण जिल्हा रुग्णालयातही चालू ठेवण्याची शक्यता असल्याने हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. परिसरातील जनतेने केंद्र आणि राज्य शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर बेलापूर-परळी रेल्वे मार्गाला मंजुरी द्यावी, अशी मागणी केली आहे. या मार्गामुळे अहमदनगर, बीड, परभणी जिल्ह्यांतील प्रवास आणि विकासाला मोठी चालना मिळेल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.