Parking: महापालिका रुग्णालये, दवाखाने बनले पार्किंग अड्डे!
Parking:

लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते अन् रिक्षाचालकांच्या वाहनांचा ताबा
Parking: पुणे शहरातील महापालिकेची रुग्णालये आणि दवाखाने खासगी वाहनांसाठी पार्किंगचे अड्डे बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, त्यांचे कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांच्यासह काही स्थानिक रिक्षाचालकांकडूनही रुग्णालयांच्या आवारात वाहने उभी केली जात आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना वाहन उभे करण्यासाठी जागा मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
महापालिका रुग्णालयांमध्ये आणि दवाखान्यांमध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांना घेऊन येणारे नातेवाईक, रुग्णवाहिका तसेच अन्य आवश्यक वाहनांसाठी रुग्णालयाच्या आवारात जागा उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, या जागेचा वापर खासगी वाहने उभी करण्यासाठी होत असल्याने रुग्णालय प्रशासनासमोरही अडचणी निर्माण होत आहेत.
विशेष म्हणजे, रुग्णालयांच्या आवारात वाहने उभी करणाऱ्यांना सुरक्षारक्षकांकडून विचारणा केली असता वादावादीचे प्रसंग घडत आहेत. काही वाहनचालक स्थानिक राजकीय संबंधांचा आधार घेत असल्याने सुरक्षारक्षकांनाही कारवाई करताना अडचणी येत असल्याचे चित्र आहे. परिणामी, रुग्णालयाच्या आवारातील वाहन पार्किंगवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयाच्या प्रमुखांनी या पूर्वीच या समस्येकडे लक्ष वेधले होते. रुग्णालयाच्या आवारातील वाहन पार्किंगच्या प्रश्नाबाबत त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुखांना पत्रही दिले होते. मात्र, या समस्येवर प्रभावी उपाययोजना होण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड परिसरातील नागपूर चाळ येथील महापालिकेच्या छत्रपती शिवराय दवाखान्यातही खासगी वाहने उभी केली जात असल्याचे दिसून येत आहे. दवाखान्याच्या जागेचा वापर रुग्णसेवेसाठी होण्याऐवजी खासगी वाहनांच्या पार्किंगसाठी होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय – Parking:
रुग्णांना उपचारासाठी आणताना वाहने उभे करण्यासाठी जागा मिळणे आवश्यक असते. मात्र, रुग्णालयांच्या आवारात खासगी वाहने उभी असल्याने नातेवाइकांना जागेसाठी शोधाशोध करावी लागते. तातडीच्या परिस्थितीत ही गैरसोय अधिक गंभीर ठरू शकते. रुग्णवाहिका आणि रुग्णांना आणणाऱ्या वाहनांसाठी आवश्यक जागा मोकळी ठेवण्याची गरज आहे.
सुरक्षारक्षकांवर नियंत्रणाची जबाबदारी – Parking:
रुग्णालयांच्या आवारात वाहने उभी करणाऱ्यांना रोखण्याची जबाबदारी सुरक्षारक्षकांवर असली, तरी विचारणा केल्यानंतर वादावादी होत असल्याने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होतात. त्यामुळे महापालिकेने पार्किंगबाबत स्पष्ट नियमावली तयार करावी, अधिकृत पार्किंगची जागा निश्चित करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर समान निकषांनुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





