Pimpri News: महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची पार्किंगसाठी वणवण!
Pimpri News: ‘व्हिजिटर पार्किंग’ची स्वतंत्र व्यवस्था करा; दक्ष नागरिक संघाची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयात विविध प्रशासकीय कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र, या नागरिकांना वाहन पार्क करण्यासाठी हक्काची जागाच उपलब्ध नसल्याने पार्किंगसाठी परिसरात वणवण फिरावे लागत आहे.
दुसरीकडे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध असल्याचे दिसून येत असल्याने “महापालिकेचे पार्किंग सामान्य नागरिकांसाठी की केवळ मान्यवरांसाठी?” असा सवाल उपस्थित झाला आहे. नागरिकांसाठी स्वतंत्र आणि पुरेशा क्षमतेचे ‘व्हिजिटर पार्किंग’ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी दक्ष नागरिक संघाचे अध्यक्ष ॲड. अजित बोराडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका मुख्यालयात मालमत्ता कर, पाणीपुरवठा, बांधकाम, नगररचना, विविध परवाने, तक्रारी तसेच अन्य प्रशासकीय कामांसाठी शहराच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येतात. मात्र, मुख्यालयाच्या आवारात सामान्य नागरिकांच्या वाहनांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने अनेकांना कार्यालयापासून दूर वाहन उभे करून पायी यावे लागते.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला तसेच कागदपत्रे घेऊन येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका मुख्यालय पुणे-मुंबई महामार्गालगत असल्याने रस्त्याच्या कडेला वाहन उभे केल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता असते. त्यामुळे “वाहन नेमके लावायचे कुठे?” असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होत आहे.
महापालिका मुख्यालयातील एकूण पार्किंग क्षमतेचा तातडीने आढावा घेऊन नागरिकांसाठी स्वतंत्र ‘व्हिजिटर पार्किंग’ निश्चित करावे. अधिकारी, लोकप्रतिनिधी व मान्यवरांसाठी किती जागा राखीव आहेत, याबाबतही प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी बोराडे यांनी केली आहे.
मुख्यालयात जागा अपुरी असल्यास जवळच्या परिसरात अधिकृत पर्यायी वाहनतळ उपलब्ध करून द्यावा. तसेच महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त पाहणी करून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
“महापालिका ही सर्वप्रथम सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी आहे. मात्र, स्वतःच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांनाच वाहन पार्क करण्यासाठी जागा मिळत नसेल, तर ही विसंगती दूर होणे आवश्यक आहे. नागरिकांसाठी स्वतंत्र आणि सुलभ ‘व्हिजिटर पार्किंग’ची व्यवस्था करावी.”— ॲड. अजित बोराडे, अध्यक्ष, दक्ष नागरिक संघ





