Paris Paralympics 2024 : भारतीय संघाचे सर्वोत्तम कामगिरीकडे लक्ष; सुमित अंतिलच्या नेतृत्वाखाली पहिली तुकडी पॅरिसला रवाना…

Paris Paralympics 2024 :- टोकियो पॅरालिम्पिकनंतर पुन्हा एकदा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दिमाखदार प्रदर्शन करण्यासाठी भारतीय संघ तयार झाला असून भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी पॅरिस येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रवाना झाली आहे. १६ खेळाडूंची ही तुकडीमध्ये टोकोयो पॅरालिम्पिकमध्ये भारताला भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या सुमित अंतिलचा देखील समावेश आहे.
पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भालाफेकपटू सुमित अंतिलसाठी ही स्पर्धा महत्वाची असणार आहे. गतवेळेस जिंकलेले सुवर्णपदक पुन्हा मिळवणे यासाठी त्याला मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. यासाठीच सुमित पहिल्या तुकडीसोबत रवाना झाला आहे. पॅरिसमधील हवामानाशी जुळवून घेताना सुमित सराव देखील करणार आहे.
सुमित अंतील आणि इतर काही पॅरा ॲथलीट खेळांच्या गावात प्रवेश करण्यापूर्वी काही दिवस नेल्सन मंडेला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये प्रशिक्षण घेणार असल्याचे पॅरा-ॲथलेटिक्सचे मुख्य प्रशिक्षक सत्यनारायण यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. नेल्सन मंडेला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे खेळाडू राहात असलेल्या ठिकाणापासून ५ किमी अंतरावर आहे. मात्र या ठिकाणी ऍथलेटिक्स, रग्बी, व्हीलचेयर टेनिस, आणि जलतरण तलाव यांच्या अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध असल्याचे सत्यनारायण यांनी सांगितले.
काही खेळाडू गेम व्हिलेजमध्ये राहून तेथे प्रशिक्षण घेऊन सराव करणार आहेत. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबाबत विचारले असता, या स्पर्धेत किमान पाच सुवर्ण पादकांसह एकूण १२ पदकांची लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
Paris Paralympics 2024 (Javelin Throw) : नवीन विश्वविक्रमासह सुवर्ण जिंकण्याचे ध्येय – सुमित अंतिल
कोबेमधील भारतीय खेळाडूंची कामगिरी…
मे महिन्यात जापान येथील कोबे या ठिकाणी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करताना सहा सुवर्ण, पाच रौप्य व सहा कांस्य पदकांची कमाई करताना पदक तक्त्यात पाचवे स्थान राखले होते. सुमित अंतिलने भालाफेक, दीप्ती जीवनजीने ४०० मीटर धावण्यात, सचिन खिलारेने गोळाफेकमध्ये, एकता भयनने क्लब थ्रो, सिमरन शर्माने २०० मीटर धावण्यात व मरियप्पन थांगावेलूने उंच उडी प्रकारांत सुवर्ण कामगिरी बजावली होती.
भारताचा संघ….
भारताने १२ खेळामध्ये ८४ खेळाडूंचा संघ या स्पर्धेसाठी पाठवणार असून त्यापैकी १६ खेळाडूंची पहिली तुकडी रवाना झाली आहे. पॅरा ऍथलेटिक्समध्ये ३८ खेळाडूंचा समावेश आहे. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारत किमान २५ पदके जिंकेल असा विश्वास समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया यांनी व्यक्त केला आहे. सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव हे खेळाडू उदघाटन सोहळ्यात ध्वजधारक असणार आहेत.





