Paris Olympics 2024 (Wrestling) : पदकांची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी भारतीय कुस्तीपटू सज्ज, विनेश पदकाची प्रबळ दावेदार…

Paris Olympics 2024 (Wrestling) : भारताने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकपासून प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये पदके जिंकली आहेत. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगटवर असतील, जिची गेली काही वर्षे गोंधळ,गदारोळ आणि वाद-विवादात गेली आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकच्या 10 व्या दिवशी म्हणजेच आज सोमवारपासून कुस्ती स्पर्धा सुरू होत आहेत. गेल्या काही ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीमध्ये सातत्याने पदके मिळत आहेत आणि कुस्तीपटूंना हाच ट्रेंड कायम ठेवायचा असेल तर विनेश फोगटसह सहाही कुस्तीपटूंना आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.
भारताने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकपासून प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये पदके जिंकली आहेत. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा अनुभवी कुस्तीपटू विनेशवर असतील, जिची गेली काही वर्षे वाद-विवादात गेली आहेत. विनेशने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन, राष्ट्रकुल स्पर्धेत तीन आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये आठ पदके जिंकली आहेत पण तिला अद्याप ऑलिम्पिक पदक जिंकता आलेले नाही.
विनेश दावेदार; पण मिळाली नाही पुरेशी संधी
महिला कुस्तीपटू विनेश पदक आणण्याची प्रबळ दावेदार आहे, मात्र विनेशला ऑलिम्पिकपूर्वी सरावाची पुरेशी संधी मिळाली नाही. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली साक्षी, बजरंग यांच्यासह आणखी काही कुस्तीपटूंनी सातत्याने आंदोलने केली. यामध्ये आंदोलन करणाऱ्या प्रमुख खेळाडूंपैकी ती एक होती. विनेशची आव्हाने इथेच संपली नाहीत. तिला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेता आला नाही. अंतिम पंघाल हिने तिच्या 53 किलो वजनी गटात कोटा मिळवल्याने विनेशला 50 किलो वजनी गटात तिचे आव्हान सादर करावे लागले आहे. ती बिगर मानांकित खेळाडू आहे म्हणजे तिचा प्रवास सोपा नसेल.
विनेशची वाट असेल खडतर…
विनेश हिच्या वजन वर्गात अनेक दिग्गज कुस्तीपटूंचा समावेश आहे, ज्यात चार वेळा विश्वविजेती युई सुसाकी, चार वेळा ऑलिम्पिक पदक विजेती मारिया स्टॅडनिक, टोकियो गेम्सची कांस्य विजेती सारा हिल्डब्रँड आणि दोन वेळा जागतिक पदक विजेती डॉल्गोर्झाविन ओटगोंजार्गल यांचा समावेश आहे. अंशू मलिक (महिला 57 किलो) आणि अमन सेहरावत (पुरुष 57 किलो) हेही पदकाच्या दावेदारांमध्ये आहेत. मात्र, सरावादरम्यान अंशूच्या मानेला दुखापत झाल्यामुळे तिच्या फिटनेसबाबत शंका आहेत.
अंतिम हिची तयारीही नाही अनुकूल…
अंतिम पंघाल हिची तयारीही फारशी अनुकूल झालेली नाही. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर तिला कोणत्याही कठीण आव्हानाचा सामना करावा लागला नाही. पाठीच्या दुखापतीमुळे ती यावर्षी मार्चमध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होऊ शकली नव्हती. भारत प्रथमच महिलांच्या 76 किलो वजनी गटात आव्हान सादर करेल ज्यामध्ये रितिका हुडा ही भारतीय स्पर्धक असेल. तिला पदकाची दावेदार मानले जात नाही परंतु ती उलटफेर करू शकते आणि तिच्या कामगिरीने लोकांना आश्चर्यचकित करू शकते. ऑलिम्पिकमध्ये आव्हान देणारी आणखी एक भारतीय कुस्तीपटू निशा दहिया हिला फार कमी अनुभव आहे. महिलांच्या 68 किलो वजनी गटात ती आपले आव्हान सादर करेल.
महिला कुस्तीगीरांवर मोठी भिस्त
गेल्या वेळी रवी दहिया आणि बजरंग पुनिया यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले होते. हे दोन्ही कुस्तीपटू यावेळी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकले नाहीत ही निराशाजनक बाब आहे. पुरुष गटात फक्त अमन सेहरावतने (57 किलो) यंदा ऑलिम्पिकची पात्रता मिळवलेली आहे. यावेळी पदकाची जबाबदारी महिलांवर असून विनेश फोगट (50 किलो), अंतिम पंघाल (53 किलो), अंशू मलिक (57 किलो), निशा दहिया (68 किलो) आणि रितिका हुडा (76 किलो) वजनी गटात आव्हान देतील. त्यामुळे कुस्तीत महिलांवरच भारताची भिस्त असणार आहे.
वादाचा तयारीला बसला फटका
हॉकीनंतर, कुस्ती हा भारताचा ऑलिम्पिकमधील सर्वात यशस्वी खेळ आहे. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकपासून या खेळात कुस्तीपटू देशासाठी सातत्याने पदके जिंकत आहेत. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये सात पदके जिंकली आहेत. काही वाद झाले असले तरी या खेळांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या कुस्तीकडून देशाला पुन्हा एकदा पदकाची आशा असेल. मात्र, डब्लूएफआय सोबतच्या वादामुळे कुस्तीपटूंच्या तयारीसाठी कायमस्वरूपी शिबिर घेण्यात आली नाहीत. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टाॅप्स) द्वारे केवळ कुस्तीपटूंची तयारी करून घेण्यात आली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) यासाठी 6.21 कोटी रुपये खर्च केले आहेत.
कुस्ती : भारताची ऑलिम्पिकमधील कामगिरी
खशाबा जाधव : (57 किलो, कांस्यपदक, हेलसिंकी 1952)
सुशील कुमार : (66 किलो, कांस्यपदक, बिजिंग 2008)
सुशील कुमार : (66 किलो, रौप्यपदक, लंडन 2012)
योगेश्वर दत्त : (60 किलो, कांस्यपदक, लंडन 2012)
साक्षी मलिक : (58 किलो, कांस्यपदक, रियो 2016)
रवि दहिया : (57 किलो, रौप्यपदक, टोकियो 2020)
बजरंग पुनिया : (65 किलो, कांस्यपदक, टोकियो 2020)
भारताचे आजचे वेळापत्रक
5 ऑगस्ट, सोमवार
निशा दहिया (भारत)
महिला फ्रीस्टाइल : 68 किलो (1/8) अंतिम फेरी, संध्याकाळी 6:30 वा.
महिला फ्रीस्टाइल 68 किलो (1/4 ) संध्याकाळी 7:50 वा.
6 ऑगस्ट, सोमवार
महिला फ्रीस्टाइल 68 किलो सेमीफायनल (पात्र ठरल्यास) मध्यरात्री 1:10 वाजता





