Paris Olympics 2024 (Wrestling) : धाकड गर्ल विनेश फोगटचा जलवा कायम, ऐतिहासिक कामगिरीसह अंतिम फेरीत मारली धडक…

Paris Olympics 2024 (Women’s Freestyle 50kg Semi-finals,V. Phogat vs Y. Guzman) : भारताची धाकड गर्ल विनेश फोगटने महिलांच्या 50 किलो वजनी गटात क्युबाच्या उस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विनेश आता किमान रौप्य पदक जिंकणार हे निश्चित आहे.
यासह विनेश फोगटने इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे. पहिल्या फेरीपर्यंत विनेश 1-0 ने आघाडीवर होती. त्यानंतर शेवटच्या तीन मिनिटांत तिने क्युबाच्या कुस्तीपटूवर दुहेरी आक्रमण करत चार गुणांची कमाई केली. ही आघाडी तिने शेवटपर्यंत कायम राखली आणि अंतिम फेरीत धडक मारली. दरम्यान, भारताची अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगटने महिलांच्या 50 किलो वजनी गटात एका तासात सलग दोन सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली होती.
विनेश हिने किमान रौप्य पदक निश्चित केले आहे आणि ती बुधवारी म्हणजेच 7 ऑगस्ट रोजी सुवर्णपदकासाठी स्पर्धा करेल. विनेशपूर्वी ऑलिम्पिकमध्ये केवळ दोन पुरुष कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचले आहेत. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमार आणि 2020 टोकियो ऑलिंपिकमध्ये रवी दहिया अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु शेवटच्या सामन्यात दोघेही पराभूत झाले.
🇮🇳 Result Update: Women’s Wrestling Freestyle 50KG SF👇@Phogat_Vinesh on a winning spree, continues her quest for glory & assures a medal🏅 for 🇮🇳 💯🔥
The seasoned grappler picked up two historic wins earlier today and went past her Cuban opponent Yusneylis Guzman Lopez in… pic.twitter.com/Kd0pgYtNEF
— SAI Media (@Media_SAI) August 6, 2024
उपांत्यपूर्व फेरीत ओसानाला केलं पराभूत….
ओसानाविरुद्ध सुरूवातीला 2-0 अशी आघाडी घेतल्यानंतर विनेशने दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीला आपली आघाडी 4-0 अशी वाढवली. ओसानानेही गुण मिळवून सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि तिने विनेशची आघाडी दोन गुणांवर (5-3) मर्यादित ठेवली. यावेळी विनेशला थकवा जाणवत होता. यावेळी तिने, प्रशिक्षकाला विश्रांतीची मागणी करण्यास सांगितले. मात्र, व्हिडीओ रेफरीने ही मागणी फेटाळली. मात्र, यादरम्यान विनेशला ताजेतवाने होण्यासाठी काही सेकंद अवधी मिळाला. विनेशने युक्रेनच्या कुस्तीपटूला बाहेर ढकलले आणि दोन गुण मिळवून तिची आघाडी 7-4 अशी केली. त्यानंतर ओसाना एक गुण मिळवण्यात यशस्वी झाली पण तो विनेशला रोखण्यासाठी पुरेसा नव्हता.
ऑलिम्पिक चॅम्पियन सुसाकीलाही लोळवले
तत्पूर्वी, राऊंड ऑफ-16 च्या सामन्यात विनेशने जपानच्या युई सुसाकीचा 3-2 असा पराभव करून मोठी कामगिरी केली. कारण, चार वेळा विश्वविजेत्या सुसाकीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. विनेशविरुद्धच्या सामन्याच्या शेवटच्या काही सेकंदापूर्वी तिने 2-0 अशी आघाडी घेतली होती. यावेळी, विनेशने अनुभवाचा पुरेपूर वापर करून सुसाकीला शेवटच्या अगदी काही सेकंदात नमवून विजय मिळवला. जपाननेही याविरोधात अपील केले पण रेफ्रींनी व्हिडिओ रिप्ले पाहिल्यानंतर तो फेटाळला.





