Paris Olympics 2024 : आंदोलनामुळे कुस्तीपटूंची खराब कामगिरी – संजय सिंग

Paris Olympics 2024 :- जानेवारी 2023 मध्ये राष्ट्रीय कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात आंदोलन पुकारले होते. याचा परिणाम म्हणून भारताने ऑलिम्पिक 2024 मध्ये सर्वात कमी पदके जिंकली आहेत, असा दावा भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग यांनी केला आहे.
गेल्या वर्षाभरापासून चालू असलेल्या आंदोलनामुळे कुस्तीपटूंना नियमित सराव करता आला नाही. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही, असे सिंग यावेळी म्हणाले आहेत.
ब्रिजभूषण सिंग यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर संजय सिंग यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. आंदोलकांनी जवळपास 14 ते 15 महिने आंदोलन केले. त्यामुळे सर्व कुस्तीपटूंचे लक्ष विचलित झाले होते. फक्त एका कॅटेगिरीपुरतं नव्हे तर कुस्तीतील इतर कॅटगिरीतील स्पर्धकही योग्य सराव करू शकले नाहीत. परिणामी त्याचा परिणाम ऑलिम्पिकमधील कामगिरीवर झाला, असेही सिंग म्हणाले.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारतासाठी संमिश्र बाब होती. भारतीय खेळाडूंनी येथे एकूण 6 पदके जिंकली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी एकूण 117 भारतीय खेळाडू पॅरिसला पोहोचले होते पण त्यापैकी 6 खेळाडूंना पदक जिंकण्यात यश आले. यामध्ये नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. तर मनू भाकर हिने वैयक्तिक आणि मिश्र सांघिक स्पर्धेत, स्वप्नील कुसाळे आणि सरबज्योत सिंग यांनी नेमबाजीत प्रत्येकी 1 कांस्यपदक जिंकले आहे. याशिवाय हाॅकीमध्ये आणि भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतने कुस्तीच्या 57 किलो गटात कांस्यपदक जिंकले आहे.





