Paris Olympics 2024 (Hockey) : उपांत्य फेरीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूवर एका सामन्याची बंदी…

Paris Olympics 2024 (Hockey) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीचा सामना उद्या म्हणजेच मंगळवार, 06 ऑगस्ट रोजी होणार आहे. भारताचा सामना जर्मनीशी होणार आहे, मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियाला स्टार डिफेंडर अमित रोहिदासच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे.
रविवारी ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमित रोहिदासला रेड कार्ड देण्यात आले होते आणि आता आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) भारताच्या अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी घातली आहे, ज्यामुळे तो मंगळवारी जर्मनीविरुद्ध होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे दुसऱ्या क्वार्टरपासूनच त्याला मैदान सोडून बाहेर जावे लागले होते.
सामन्याच्या 17व्या मिनिटाला रोहिदासची हॉकी स्टिक एका ब्रिटीश खेळाडूच्या डोक्यावर लागली, परंतु रेफ्रींनी हे जाणूनबुजून केलेले कृत्य मानले आणि त्याला संपूर्ण सामन्यातून बाहेर काढले. त्यानंतर भारतीय संघ 10 खेळाडूंसह सुमारे 42 मिनिटे खेळला. मात्र, हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने हार न मानता पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. रेड कार्ड मिळाल्यावर खेळाडूवर एका सामन्याच्या बंदीची शिक्षा लागू होते. यामुळे त्याला स्पर्धेच्या पुढील सामन्यातून बाहेर बसावे लागते . अमित हा उत्कृष्ट बचावपटू असून संघात त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाचा बचाव कमकुवत होऊ शकतो.
एफआयएचने निवेदनात काय म्हटले आहे?
एफआयएचच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की,“4 ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध ब्रिटन सामन्यादरम्यान एफआयएच (FIH) आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल अमित रोहिदासला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबन सामना क्रमांक 35 (भारताचा जर्मनी विरुद्धचा उपांत्य सामना) मध्ये लागू होईल, ज्यामध्ये अमित रोहिदास भाग घेणार नाही आणि भारत फक्त 15 खेळाडूंच्या संघासह खेळेल.”
हॉकी इंडियाने उपस्थित केले प्रश्न…
पॅरिस ऑलिम्पिकमधील हॉकी स्पर्धेत पंचांच्या दर्जाबाबत हॉकी इंडियाने अधिकृतपणे चिंता व्यक्त केली. ही तक्रार भारत आणि ब्रिटन यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याशी संबंधित आहे ज्यात पंचांच्या अनेक निर्णयांमुळे सामन्याच्या निकालावर परिणाम झाला. या तक्रारीत हॉकी इंडियाने रोहिदासला दाखविलेल्या रेड कार्डच्या संदर्भात विसंगत व्हिडिओ, अंपायर रिव्ह्यू सिस्टीमबाबत तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे, तसेच शूटआऊटदरम्यान गोलरक्षकाच्या प्रशिक्षणावर आणि गोलरक्षकाने व्हिडिओ टॅब्लेटच्या वापरावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
हॉकी इंडियाने ‘या’ निर्णयाला दिले आव्हान…
एफआयएचने रोहिदासवर एक सामन्याच्या बंदीची पुष्टी करणारे निवेदन जारी केले आहे. हॉकी इंडियाने महासंघाच्या निर्णयाला आव्हान दिले असले तरी सध्याच्या परिस्थितीत रोहिदासच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. एफआयएच सोमवारी या अपिलावर सुनावणी करून उत्तर दाखल करेल, असे मानले जात आहे.





