Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. भारताने आतापर्यंत एकूण पाच पदके जिंकली असून त्यात चार कांस्य आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे. पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या खात्यात एकच पदक आहे. पाकिस्तानने ॲथलेटिक्समध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
भालाफेकमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले, जो ऑलिम्पिक मधील विक्रम ठरला. तर भारताच्या नीरज चोप्राने 89.45 मीटर भालाफेक करून भारताला रौप्यपदक मिळवून दिले. ऑलिम्पिक खेळांच्या इतिहासात पाकिस्तानसाठी हे चौथे सुवर्णपदक होते, याआधी पाकिस्तान हॉकी संघाने अनुक्रमे 1960, 1968 आणि 1984 मध्ये तीन सुवर्णपदके जिंकली होती. अॅथलेटिक्स आणि वैयक्तिक स्पर्धेत पाकिस्तानचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
भारत पदकतालिकेत पाकिस्तानपेक्षा इतका मागे का…?
पॅरिस ऑलिम्पिक खेळांच्या पदकतालिकेबद्दल बोलायचे झाले तर भारत 64 व्या, तर पाकिस्तान 53 व्या स्थानावर आहे. भारताने एकूण पाच पदके जिंकली आहेत, तर पाकिस्तानच्या खात्यात फक्त एकच पदक आहे, पण तरीही पाकिस्तान पदकतालिकेत भारतापेक्षा वरच आहे. आता समजून घेऊया की, पाच पदके मिळवूनही भारत पदकतालिकेत पाकिस्तानपेक्षा इतका मागे का आहे? वास्तविक, ऑलिम्पिक पदकतालिकेत दिलेली क्रमवारी सुवर्ण पदकांच्या आधारे दिली जाते. सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणारा संघ हा पदकतालिकेत अव्वल स्थानावर राहतो.
Paris Olympics 2024 (Athletics) : टोकियोपेक्षा चांगली कामगिरी, तरीही नीरजच्या हाती लागलं रौप्यपदक…
सुवर्णपदक जिंकण्याच्या भारताच्या आशा संपुष्टात…
भारताच्या खात्यात पाच पदके नक्कीच आहेत, पण या पाचपैकी एकही सुवर्णपदक नाही. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत चार कांस्य आणि रौप्य पदक जिंकले आहे. भारताने आतापर्यंत नेमबाजीमध्ये तीन पदके, हॉकीमध्ये एक कांस्य पदक आणि ॲथलेटिक्समध्ये एक रौप्य पदक जिंकले आहे. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्या भारताच्या आशा जवळपास संपल्या आहेत. अशा परिस्थितीत यावेळच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदतालिकेत पाकिस्तान भारतापेक्षा वर असेल.