Paris Olympics 2024 (Athletics) : टोकियोपेक्षा चांगली कामगिरी, तरीही नीरजच्या हाती लागलं रौप्यपदक…

Paris Olympics 2024 (Neeraj Chopra,Men’s Javelin Throw Final) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताने आतापर्यंत फक्त 4 पदके जिंकली आहेत आणि चारही कांस्य पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये नेमबाजीतील तीन पदकांशिवाय बुधवारी हॉकीमध्ये जिंकलेल्या कांस्यपदकाचा समावेश आहे.
दरम्यान, भालाफेक या क्रीङाप्रकारातून भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या 13व्या दिवशी भारताच्याा खात्यात आणखी एक पदक जमा झालं आहे.भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रानं दुस-या स्थानी राहत रौप्यपदक मिळवलं आहे.
टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. नीरजनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकलं होते.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आज पाकिस्तानच्या नदीमने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटरची विक्रमी फेक करून सुवर्णपदक जिंकले आहे तर नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह रौप्यपदक मिळवलं आहे.त्याचवेळी ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 88.54 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह तिसरे स्थान पटकावताना कांस्यपदक मिळवले.
नीरज आणि नदीमने फाऊलने सुरुवात केली, पण पाकिस्तानच्या नदीमने दुसऱ्या प्रयत्नात ऑलिम्पिक विक्रम मोडीत काढत आपला दावा मजबूत केला. दुसऱ्या प्रयत्नात नीरजनेही आपल्या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली, मात्र त्याला नदीमला मागे टाकता आले नाही. नीरजला फक्त एकच यशस्वी प्रयत्न करता आला आणि त्याने सहा पैकी पाच फाऊल केले, तर नदीमने सहाव्या प्रयत्नात 91.79 मीटर भाला फेकला. या सामन्यात नदीमने 90 मीटरपेक्षा जास्त फेक करण्याची ही दुसरी वेळ होती.
पहिल्याच थ्रोमध्ये गाठली होती अंतिम फेरी….
तत्पूर्वी, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मंगळवारी (6 जुलै) भालाफेक पात्रता फेरी खेळली गेली. यामध्ये भारताच्या नीरज चोप्राने विक्रमी थ्रो करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पात्रता फेरीतील पहिल्याच थ्रोमध्ये नीरज चोप्राने 89.34 मीटर अंतर कापले होते. हा नीरजचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो ठरला. तसेच पात्रता फेरीत नीरज अव्वल स्थानी राहिला होता.
Paris Olympics 2024 (Hockey) : हाॅकीमध्ये टीम इंडियाची कांस्य भरारी…
किशोर जेना आधीच ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर
दरम्यान, भारताचा दुसरा भालाफेकपटू किशोर जेना मंगळवारी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या पात्रता फेरीत ‘अ’ गटातून नवव्या आणि स्पर्धेत एकूण 18व्या स्थानावर राहिला होता. यामुळे त्याचे तेव्हाच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. किशोर जेना याने त्याच्या पहिल्या प्रयत्नात 80.73 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला तर दुसऱ्या प्रयत्नात त्याचा फाऊल झाला. त्याने तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नात 80.21 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला होता.





