Ayush Komkar : आयुष कोमकरच्या अंत्यसंस्कारासाठी आई-वडिलांना जेलमधून आणलं, ‘वैकुंठ’मध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त

पुणे : पुण्यातील नाना पेठेतील टोळीयुद्धाचा बळी ठरलेल्या १८ वर्षीय आयुष उर्फ गोविंद कोमकर याच्यावर आज (८ सप्टेंबर) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. आयुषचे आई-वडील, कल्याणी आणि गणेश कोमकर, हे माजी राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी असून सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहेत.
मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना पुण्यात आणण्यात आले आहे. आंदेकर टोळीचा धोका लक्षात घेता, वैकुंठ स्मशानभूमीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
५ सप्टेंबर २०२५ रोजी, गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी, आयुष कोमकर हा त्याच्या क्लासवरून घरी परतला होता. नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळील इमारतीच्या पार्किंगमध्ये गाडी लावत असताना यश पाटील याने त्याच्यावर ११ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ९ गोळ्या आयुषच्या शरीरात शिरल्या.
या हल्ल्यात आयुषचा जागीच मृत्यू झाला. यश पाटील आणि त्याचा साथीदार अमित पाटोळे यांनी गोळीबारानंतर “इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर” अशा घोषणा देत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पुण्यातील टोळीयुद्ध पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
वनराज आंदेकर हत्येचा बदला
आयुष कोमकर हा गणेश कोमकर यांचा मुलगा आणि वनराज आंदेकर यांचा भाचा होता. गणेश कोमकर हे वनराज आंदेकर हत्येप्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असून, सध्या कारागृहात आहेत. वनराज आंदेकर यांची १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेत गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या करण्यात आली होती.
या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषला लक्ष्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आयुषच्या हत्येमुळे पुण्यातील टोळीयुद्ध आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




