पुणे : वारजे पोलिसांनी उघडकीस आणलेला एक खुनाचा गुन्हा सध्या संपूर्ण पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे. या घटनेत एका पतीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करून तिचा मृतदेह स्वतः बनवलेल्या लोखंडी भट्टीत जाळून टाकला, आणि त्यानंतर ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देऊन सर्वांना चकवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अत्यंत कौशल्याने या दृष्टम-स्टाईल खुनाचा पर्दाफाश केला. समीर जाधव (व्यवसाय फॅब्रिकेशन काम) असे आरोपीचे नाव असून, अंजली समीर जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अंजली एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. चौकशीत समजले की, अंजलीच्या चारित्र्यावर संशय घेत समीरने तिच्याशी वाद घातला. संतापाच्या भरात त्याने अंजलीचा खून केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी स्वतःच तयार केलेल्या लोखंडी भट्टीत तिचा मृतदेह जाळून टाकला. यानंतर संशय टाळण्यासाठी समीर थेट वारजे पोलिस ठाण्यात जाऊन अंजली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी तपासाची सखोल छाननी करताच त्याचे सर्व गणित कोलमडले. पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासकौशल्याचे कौतुक सर्वत्र होत आहे.