Parbhani News : “मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार”; नाना पटोले यांचा फडणवीसांवर निशाणा

Parbhani | Nana Patole | Devendra Fadnavis – परभणी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानसभा सभागृहात मुख्यमंत्र्यांनी खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिली. या विरोधात काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
नाना पटोले म्हणाले, खासदार राहुल गांधी यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय नाटक असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक खरी परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही आज परभणीत आलो आहोत. स्व. सोमनाथ सुर्यवंशीला पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. परंतु विधानसभा सभागृहात मुख्यमंत्र्यांनी स्व. सुर्यवंशीला दम्याचा आजार होता म्हणून त्याचा मृत्यू झाला, अशी खोटी व सभागृहाची दिशाभूल करणारी माहिती दिली. या विरोधात काँग्रेस मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार असल्याचे ते म्हणाले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी हे लोकसभेत वास्तविकता मांडतील व सरकारचे पितळ उघडे करतील. सरकार ठरवून मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करीत असून आम्ही लोकशाही पध्दतीने या विरोधात आवाज उठवू असे सांगत काँग्रेस पक्ष हा सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांशी पाठीशी खंबीरपणे उभा असून जो पर्यंत या घटनेतील दोषीवर कारवाई होणार नाही तो पर्यंत शांत बसणार नसल्याचे पटोले म्हणाले.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या झाली आहे. या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे. पोलिसांनी सोमनाथ सुर्यवंशीला मारहाण करून त्याची हत्या केली आहे, असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी हा दलित होता म्हणून त्याच्यावर अन्याय करण्यात आला. त्याला मारहाण करण्यात आली आहे. दलित आहे म्हणून सोमनाथ सुर्यवंशीची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनीच त्याला मारलं आहे. या घटनेला आरएसएसची विचारधारा जबाबदार आहे. या ठिकाणी कोणतेही राजकारण होत नाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटं बोलले आहेत, असं देखील राहुल गांधींनी यावेळी सांगितलं आहे.





