Parbhani Bribe: परभणी जिल्ह्यात बुधवारी (दि. ८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना रंगेहात पकडत मोठी कारवाई केली. पालम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश खंदारे आणि पाथरी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी रामेश्वर बिडकर यांना लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. पालम ग्रामीण रुग्णालयातील प्रकरणात, स्वच्छता सेवेसाठी भरलेल्या निविदेला मंजुरी देण्यासाठी डॉ. रमेश खंदारे यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारदाराच्या भावाच्या ‘परिवर्तन लेबर कॉन्ट्रॅक्टर अँड मल्टीसर्विसेस’ या फर्मने ही निविदा भरली होती. तक्रारीची पडताळणी करताना तडजोडीनंतर पंचासमक्ष डॉ. खंदारे यांनी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान आरोपीकडून रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यांच्या वाहनात अतिरिक्त १५ हजार रुपये आढळून आले. सध्या त्यांच्या घराची झडती सुरू असून पालम पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात पाथरी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार रामेश्वर बिडकर यांना ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. जलसिंचन प्रकल्पामुळे अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या पुनर्मोजणीसाठी त्यांनी ही लाच मागितली होती. तक्रारदाराच्या पुतण्याची वडी (ता. पाथरी) येथील गट क्रमांक २४ मधील जमीन ढालेगाव बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमध्ये गेली होती. पुनर्वसनासाठी झालेल्या मोजणीत जमीन कमी दाखवण्यात आल्याने फेरमोजणीसाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. याच प्रक्रियेदरम्यान रामेश्वर बिडकर यांनी सुरुवातीला १५ हजार रुपयांची लाच मागितली. पडताळणीदरम्यान त्यांनी पंचासमक्ष १२ हजार रुपयांवर तडजोड केली. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता पाथरी येथील साईमंदिर रस्ता परिसरातील एका दुकानात सापळा रचण्यात आला. यावेळी बिडकर यांनी तक्रारदाराकडून ८ हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. दोन्ही प्रकरणांमुळे जिल्ह्यात एकाच दिवशी उघडकीस आलेल्या लाचखोरीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे.