परमार्थ : गुरूकिल्ली

– अरुण गोखले
महाराज कधी कधी मोजक्या जाणकार लोकांच्या समोरच आपल्या मनातली खंत बोलून दाखवीत. ते म्हणत- त्याचं काय आहे मला ह्या लोकांची मोठी गंमत वाटते. प्रत्येकजण आपल्या ऐहिक मागण्या घेऊन माझ्याकडे येतो. पण कोणी मला तो प्रपंच्यातला परमार्थ दाखवा, शिकवा, भेटवा असे मात्र मागत नाही.
कारण त्यांना हे माहीतच नाही की प्रपंच्यातच परमार्थ आहे. जो प्रपंच नको म्हणतो त्याला मनातून तो प्रपंच हवाच असतो आणि परमार्थ करणारेही परमार्थाचा प्रपंच हा मांडूनच असतात. वास्तविक प्रपंच काय आणि परमार्थ काय हे नेमकेपणाने जाणून समजून घ्यायला हवे. माझा आणि स्वार्थाने केला की तो प्रपंच आणि माझा नाही तर त्याचा आहे, हेे लक्षात घेऊन नि:स्वार्थ बुद्धीने केला की तोच प्रपंच परमार्थाचा होतो. पण हे कोणी जाणून घेत नाही.काय हवं आणि काय नको ह्यापेक्षा नेमके काय आणि कसे मिळवायवे हे कळायला हवे.
असं बघा की जेव्हा आपण एखादं रुपयाचं नाणं हातात घेतो तेव्हा त्या नाण्याच्या दोन्ही बाजू या आपल्या हातात आपोआप येतातच ना. ङ्गक्त पुढची आणि मागची बाजू समजली म्हणजे झालं. तसं प्रपंच हा खर्या अर्थाने कळला की त्यातच लपून बसलेला परमार्थही कळतो. जसा आपला प्रपंच नीटनेटका होण्यासाठी आपल्याला पैसाआडक्याची, धनसंपत्तीची गरज असते तसेच आपला परमार्थ हादेखील सार्थ होण्यासाठी तिथेही चित्ताची एकाग्रता, मनाची स्थिरता आवश्यक असते. आपण जसा प्रपंच्यात कष्टाने पैसा कमवितो तशी परमार्थात प्रयत्नाने, साधनाने, उपासनेने चित्ताची एकाग्रताही मिळवावी लागते.
खरं म्हणजे आपल्याला देवाच्या, गुरूंच्या कृपेने या दोन्ही प्रांतात इतकंच मिळायला हवं असतं की संसारात आपल्याला कोणापुढे लाचारीने हात पसरावा लागू नये. तर परमार्थात आपले मन, चित्त हे इतके त्या ईश नामसाधनेत रमावे की ते आपल्या उपास्य देवतेच्या श्रद्धेपासून, भक्तीपासून, शरणागत भावापासून आपण कधीही विभक्त होऊ नये. या दोन्ही गोष्टी आपल्याला देते ती सदगुरू नामाची गुरूकिल्ली. सद्गुरूंनी दिलेल्या नामाची किल्ली जर आपण कनवटीस लावून घेतली, तर त्या नामाच्या किल्लीने प्रपंच्याचे दार उघडते आणि परमार्थातले भक्तीप्रेमाचे घबाड आपल्या हाती अगदी सहजतेने लागते. पण आधी ती नामाची गुरूकिल्ली मिळायला हवी.





