Beed News : ‘माझ्या लेकाला कापलं तसचं आरोपीला कापा’; महादेव मुंडेंच्या आईने फोडला टाहो

बीड : एकीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना दुसरीकडे मृत महादेव मुंडे यांच्या कुटुंबाने न्यायाच्या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. याच उपोषणादरम्यान महादेव मुंडे यांच्या आईने हंबरडा फोडला. आरोपींनी माझ्या मुलाला जसं कापलं तसं त्यांनाही कापा असा संतापदेखील महादेव मुंडेंच्या आईंनी व्यक्त केला.
काय म्हणाल्या महादेव मुंडेंच्या आई?
न्यायासाठी सर्वांकडे गेलो मात्र कोणीच न्याय दिला नाही असी खंत महादेव मुंडे यांच्या वडिलांनी व्यक्त केली. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण स्थळावरून उठणार नाही असा पवित्रा मुंडे कुटुंबांनी घेतला आहे. ” माझ्या लेकाला चोरून का मारलं? माझ्या मुलाचा गुन्हा माझ्या पदरात टाकायचा होता. मी भरून दिला असता, माझ्या लेकाला तसं मारायला नव्हतं पाहिजे. आरोपी सापडल्यानंतर मी त्यांना विचारणार का मारलं? कसं मारलं माझ्या मुलाला… कशासाठी माझ्या लेकाला कापलं त्यांनी, जसे माझ्या मुलाला कापलं तशीच त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मला जगण्याची इच्छा नाही, भिंतीला धडका घेऊ वाटतात”, असा हंबरडा महादेव मुंडे यांच्या आईने फोडला.
मुंडे कुटुंबाचा निर्धार
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण कुटुंब, लहान लेकरांसह न्यायासाठी उपोषणाला बसलं आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत उठणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी घेतला आहे.गेल्या 16 महिन्यांपासून आम्ही पोलिसांच्या दारात फिरतोय, नेत्यांच्या भेटी घेतोय, पण कुणीही न्याय दिला नाही. शेवटी आता उपोषण कराव लागत आहे असे मुंडे कुटुंबानी म्हंटले आहे.





