Ashadhi Wari : शेकडो वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नये; पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बीड – श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरून दरवर्षी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीला सरकारने परवानगी देऊन वारीचा मार्ग मोकळा करावा व वारीच्या 125 वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नये, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
करोना संकटामुळे यंदा आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातील मानाच्या 10 पालख्यांना राज्य सरकारने एसटीने पंढरपूरला जाण्यास परवानगी दिली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला 100 तर इतर आठ पालखी सोहळ्यांना प्रत्येकी 50 भाविकांसह एसटीने पंढरपूरला जाण्यास परवानगी दिली आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेल्या गहिनीनाथ गडाच्या पालखीला परवानगी न मिळाल्याने भाविक भक्तांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी या पालखीच्या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या गडाची परंपरा अबाधित राहावी यासाठी परवानगी द्या, अशी मागणी केली आहे.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरून दरवर्षी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीला सरकारने परवानगी देऊन वारीचा मार्ग मोकळा करावा व वारीच्या १२५ वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नये अशी मागणी @CMOMaharashtra कडे पत्राद्वारे केली आहे. pic.twitter.com/PFtJOwPUpF
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 17, 2021
हजारो भक्तांचे श्रद्धास्थान बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड (ता. पाटोदा) येथे नवनाथांपैकी एक असलेल्या गहिनीनाथ यांची संजीवन समाधी आहे. दरवर्षी हजारो भाविकांसह या गडावरून वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरला जात असते.
संत वामनभाऊ महाराज यांनी 125 वर्षापूर्वी या दिंडीची सुरुवात केली होती, ही परंपरा अखंड आजपर्यंत सुरू आहे. सध्याचे महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा सुरू आहे. सध्या कोरोना महामारीमुळे सरकारने या दिंडीला परवानगी दिली नाही, त्यामुळे भाविक भक्तांमध्ये खूप अस्वस्थता निर्माण झाली आहे. तथापि, गहिनीनाथ गडाच्या वारीचा विषय हा लाखो भक्तांच्या भावनेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. ही परंपरा अखंड चालू राहावी यासाठी सरकारने कोविड नियमांचे पालन व शासकीय नियमाप्रमाणे या वारीला परवानगी देऊन वारीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.




