Pankaja Munde: “सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार” ; पंकजा मुंडे यांचं आश्वासन
Pankaja Munde: दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याची ग्वाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

Pankaja Munde: दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याची ग्वाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मंत्री आणि आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. लवकरच दुष्काळी परिस्थितीबाबत ठोस उपाययोजना जाहीर केल्या जातील, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.
मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी तालुक्यातील पांगरी परिसरात अत्यल्प पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं.
नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ३२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली असून, आता दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यासोबतच जालना जिल्ह्यातही पाहणी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जनावरांच्या चाऱ्याचं नियोजन सुरू असल्याचंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं. ज्या भागात पाणी उपलब्ध आहे किंवा तलावांच्या परिसरात गाळामध्ये चाऱ्याची पेरणी केली जात आहे, तो चारा पशुधनासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये चारा मुबलक आहे, तिथून टंचाई असलेल्या जिल्ह्यांमध्ये चारा आणण्याचं नियोजन करण्यात येत असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.





