पंकज त्रिपाठी यांना मातृशोक, 89 व्या वर्षी आईचं निधन

Pankaj Tripath | अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या आई हेमवंती देवी यांचे 89 व्या वर्षी निधन झालं आहे. शनिवारी बिहारमधील गोपाळगंजच्या बेलसंड येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. पंकज यांच्या आईचे अंत्यसंस्कार शनिवारी बेलसंड येथे जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थित करण्यात आले.
याबाबत त्रिपाठी कुटुंबानं एका निवेदनात म्हटलं आहे की, ‘श्रीमती हेमवंती देवी यांच्या निधनाची घोषणा करताना आम्हाला खूप दुःख होत आहे. त्या ८९ वर्षांच्या होत्या आणि काही महिन्यांपासून आजारी होत्या. पंकज त्रिपाठी त्यांच्यासोबत होते.’ या दुःखाच्या काळात कुटुंबाने प्रायव्हसीचं आवाहन केलं आहे आणि सर्वांना विनंती केली आहे की, त्यांनी श्रीमती हेमवंती देवींसाठी प्रार्थना करावी.
पंकज त्रिपाठींचं आपल्या आईशी अतिशय जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये त्यांच्या आयुष्यातील संस्कार, संयम आणि साधेपणा आईकडूनच मिळाला असल्याचे सांगितले होते.
2023मध्ये वडिलांचे निधन
यापूर्वी, अभिनेत्याचे वडील पंडित बनारस त्रिपाठी यांचे 21ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्या मूळ गावी निधन झाले. त्यावेळी पंकज त्रिपाठी मुंबईत ‘ओएमजी 2’ चे प्रमोशन करत होते आणि ही बातमी मिळताच ते अंत्यसंस्कारासाठी बिहारला परतले होते.
अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून पंकज त्रिपपाठी यांना नवी ओळख मिळाली. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी ‘मसान’, ‘न्यूटन’, ‘स्त्री’, ‘मिर्झापूर’, ‘मिमी’ आणि ‘ओएमजी 2’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. अप्रतिम अभिनयासाठी पंकज त्रिपाठी यांना 2023 मध्ये ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
हेही वाचा :
उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाड्यात! ‘दगाबाज रे’ दौऱ्याच्या माध्यमातून साधणार शेतकर्यांशी संवाद





