Pandharpur : विठ्ठल मंदिर लेखा परीक्षणावरून गोंधळ; देवाचे कोणतेही दागिने गहाळ नसल्याचा प्रशासनाचा खुलासा

Pandharpur Vitthal Temple : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सन 2021-22 च्या लेखा परीक्षण अहवालावरून पुन्हा एकदा गोंधळ उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मंदिरातील काही मौल्यवान वस्तूंचा तपशील सापडत नसल्याचा शेरा लेखा परिक्षकांनी दिल्यानंतर आता मंदिर प्रशासनाने याबाबत खुलासा केला आहे.
यापूर्वी मंदिराच्या लेखा परीक्षण अहवालात लाडू प्रसादाबाबत देखील ताशेरे ओढले होते. आता यातच मंदिराचे पुरातन वस्तूबाबत लेखा परीक्षणात उल्लेख करण्यात आला होता. यात नित्योपचार विभागातील 15 ठिकाणच्या विविध चांदीच्या वस्तूंची ताळेबंधाला आणि रजिस्टरला नोंद घेतली नसल्याचे दाखविले होते.
यात सभा मंडप समोरील चांदीचा दरवाजा, गरुड खांब, चांदीचा मोठा दरवाजा, देवाच्या शेजघराचा दरवाजा यासह 15 ठिकाणच्या चांदीच्या नोंदी नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हे सर्व दारांवरील चांदी ही 18व्या शतकात अर्पण केलेली असून याबाबत शासनाने तज्ज्ञांकडून त्याची किंमत ठरवून देण्याची मागणी समितीने केली आहे.
याशिवाय पानपुडा, पिकदाणी, पंखा हे मूल्यांकनात तपासनीस उपलब्ध झाला नसल्याचा शेरा आहे. कुकची वाटी, कवाळ, सोन्याची नाथ, मासोळी, मोठी चांदीची पार्ट्याही वस्तू मूल्यांकन अहवालात उपलब्ध झालेल्या नाहीत असा शेरा होता.
देवाच्या स्वयंपाक ओवरीमधील धुपारातील वापरात येणार चांदीचा सोठ्या तपासनीस उपलब्ध झाला नसल्याचा शेरा होता. अशा पद्धतीने अनेक बाबींवर लेखा परीक्षणात शेरे आल्याने पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली.





