पुणे जिल्हा | खेडमधील 15 हजार भाविकांना पंढरीचे दर्शन

आळंदी, (वार्ताहर) – मी सेवेकरी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर विठ्ठल मुंगसे यांनी राबवलेल्या पंढरपूर यात्रेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील जवळपास 15 हजारांपेक्षा अधिक जणांनी विठूरायाचे दर्शन घेतले.
आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन वैष्णवांचा मेळा लाडक्या विठूरायाच्या भेटीसाठी देहू-आळंदीहून दिंड्या पताकांसह पंढरपूरकडे पायी निघतो.
पण अनेकांना काही कारणांनी पायी वारी करता येत नाही. अशा विठ्ठल भक्तांसाठी सुधीर मुंगसे यांनी मी सेवेकरी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत पंढरपूर यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांना पंढरपूरला जाऊन आपल्या विठुरायाचे दर्शन घेता आले.
सुधीर मुंगसे म्हणाले की, पंढरपूरचा पांडुरंग हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला निघतात. पण, अनेकांना मनोमन वारीला जाण्याची इच्छा असली तरी काही कारणांमुळे शक्य होत नाही.
त्यामुळेच आम्ही हा यात्रेचा उपक्रम राबवला. जेणे करुन एक दिवस का होईना आषाढी वारीच्या काळात पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेता येईल. या उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील पंधरा हजाराहून अधिक लोकांना विठ्ठलाचे दर्शन घडवण्याचे भाग्य मला लाभले.





