पुणे शहरातील पालखी सोहळा नियोजन

पुणे – शहरात शुक्रवारी दाखल होणाऱ्या पालखी सोहळण्यासाठी महापालिका आणि शहर पोलिसांकडून संयुक्त व्यवस्थापन केले जाणार आहे. या नियोजनासाठी बुधवारी महापालिकेत दोन्ही विभागांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही विभागांकडून केलेल्या कामांची माहिती देण्यात आली तसेच पालखी मार्गाच्या सुरक्षेसह भाविकांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस निखिल पिंगळे (पोलीस उपआयुक्त झोन-१ ) यांच्यासह महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहरात पालखी कालावधीत दिंड्यांच्या पार्किंगसाठी जागा, शहरातील वाहतूक वळविणे, सीसीटीव्ही यंत्रणा अशा विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय
– सर्व कर्मचाऱ्यांनी नेमणूक केलेल्या जागी उपस्थित रहावे.
– सीसीटीव्ही यंत्रणा २४ तास सुरू ठेवावी.
– दिंड्यांच्या मुक्कामी अग्निशमन सुरक्षा यंत्रणा ठेवावी.
– मुक्काम ठिकाणी चिखल असल्यास तातडीने मुरूम टाकावा.
– वाहतूक वळविताना मोठ्या रस्त्यांचा विचार करावा.
– अखंडितपणे वीजपुरवठा होणेसाठी जनरेटरची व्यवस्था करावी.
– पालखी मार्गावरील अनधिकृत होर्डिंग काढावेत.
– कचरा संकलनाची व्यवस्था करावी
– अनधिकृत पथारी व्यावसायिकांना तातडीने हटवावे.





