Palghar News : वाहतूक कोंडीचा बळी ! महिलेने ॲम्ब्युलन्समध्ये घेतला अखेरचा श्वास

पालघर : वाहतूक कोंडीमुळे एका महिलेला ॲम्ब्युलन्समध्ये अखेरचा श्वास घ्यावा लागला. या घटनेमुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. छाया कौशिक पुरव (गुरव) असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून त्या पालघर तालुक्यामधील सफाळे येथील मधुकर नगरमध्ये आल्या होत्या.
छाया पुरव या मूळच्या सफाळ्याच्या असून मुंबईतील माहीम कोळीवाडा येथे वास्तव्यास होत्या. सुट्टीसाठी त्या मूळ गावी आल्या होत्या. पालघर जिल्हा परिषदेची शाळा आणि घराजवळ झाडांच्या फांद्या कापण्याचे काम सुरू होते. अचानक झाडाची फांदी कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. सुरुवातीला त्यांना पालघरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर होत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना माहीममधील हिंदुजा रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.
मुंबईकडे जाताना घोडबंदर महामार्गावरील दुरुस्ती कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. त्यामुळे छाया पुरव असलेल्या ॲम्ब्युलन्सला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. वास्तविक हे अंतर 100 किलोमीटर असून त्यासाठी अडीच तास लागतात. मात्र, प्रचंड वाहतुकीमुळे तीन तासांत ॲम्ब्युलन्सने निम्मे अंतर पार केले होते. त्यातच त्यांना दिलेल्या ॲनेस्थेशियाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला होता. अखेरीस छाया पुरव यांच्या पतीने त्यांना मिरा रोडमधील ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी छाया पुरव यांना मृत घोषित केले.





