Palghar News : बोईसर MIDC मध्ये वायू गळती; 3 कामगारांचा मृत्यू

पालघर: पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसी परिसरातून एक धक्कादायक आणि दु:खद बातमी समोर आली आहे. येथील मेडली फार्मासिटीकल्स लिमिटेड कंपनीच्या (प्लॉट नंबर एफ 13) कारखान्यात दुपारी झालेल्या वायुगळतीच्या गंभीर दुर्घटनेत 8 कामगारांना बाधा झाली आहे. या घटनेत 3 कामगारांचा मृत्यू झाला असून, उर्वरित 5 कामगारांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही दुर्घटना दुपारच्या सुमारास घडली. वायुगळतीमुळे बाधित झालेल्या सर्व 8 कामगारांना तातडीने उपचारासाठी बोईसरमधील शिंदे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान 3 कामगारांचा मृत्यू झाला, तर 5 जणांवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेचे नेमके कारण आणि वायुगळतीमागील परिस्थिती याबाबत तपास सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, पुढील कारवाई सुरू आहे.
ही घटना तारापूर एमआयडीसी परिसरातील कारखान्यांमधील सुरक्षाविषयक चिंता पुन्हा एकदा अधोरेखित करते. यापूर्वीही या परिसरात अशा दुर्घटना घडल्या असून, कामगारांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कामगारांच्या प्रकृतीबाबत प्रशासन आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.





