पालघर हादरले! कारखान्यात एसीच्या स्फोटात होरपळलेल्या तिन्ही कर्मचाऱ्यांचा मृत्यू
Palghar factory Blast : पालघरमधील विस्तार मेटल कंपनीत एसी युनिटच्या स्फोटात जखमी झालेल्या मोहम्मद अन्सारी, अखिलेश जयस्वाल आणि किसान निकम यांचा मृत्यू झाला आहे

Palghar factory Blast : पालघर जिल्ह्यात एका कारखान्यात झालेल्या एसी युनिटच्या स्फोटात जखमी झालेल्या तीन व्यक्तींचा रविवारी मृत्यू झाला. हा स्फोट शनिवारी अबितघर-अभंग पाडा परिसरातील विस्तार मेटल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडला.
मृतकांची ओळख मोहम्मद अन्सारी (३२), अखिलेश कुमार मोतीलाल जयस्वाल (४५) आणि किसान निकम (५७) अशी पटली आहे. घटनेच्या वेळी हे तिघेही तिथे देखभालीचे (मेंटेनन्सचे) काम करत होते. स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असताना या तिघांचाही मृत्यू झाला.
या तिघांनाही कामावर नेमणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम सुरू असताना सुरक्षेचे योग्य नियम पाळले गेले होते की नाही, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.





