पिंपरी | पालखी स्वागताला मेट्रोचा अडथळा नको

पिंपरी, (प्रतिनिधी) – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पायी आषाढी वारी पालखी सोहळा येत्या २८ पासून असणार आहे. त्यानिमित्त शहरात येणाऱया वैष्णव बांधवांना तसेच पालखीच्या स्वागताला मेट्रोच्या कामाचा अडथळा नको. तसेच अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे पत्र महामेट्रोला पिंपरी चिंचवड महापालिकेने दिले आहे.
पिंपरी ते निगडी या मार्गावर महामेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामासाठी निगडी ते पिंपरी या पालखीमार्गावर महामेट्रोमार्फत भूगर्भ स्तरांच्या परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेडींग करण्यात येत आहे.
यामुळे पालखीमार्गास अडथळा होण्याची शक्यता आहे. तसेच पिंपरी ते दापोडी दरम्यानही विविध ठिकाणी महामेट्रोची कामे अद्याप अपूर्ण आहेत. ती कामे पूर्ण करण्याबाबतचे पत्र महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना महापालिका प्रशासनाने दिले आहे. तसेच २५ जूनपासून पालखी सोहळा मार्गस्थ होईपर्यंत मेट्रोचे शहरातील काम बंद ठेवण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
चिंचवड ते एम्पायर इस्टेटपर्यंत बॅरिकेडींग
पिंपरी-चिंचवड शहरात श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २९ जूनला येणार असून, ३० जूनला पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. तर, निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या कामासाठी सध्या चिंचवड स्टेशन ते एम्पायर इस्टेटपर्यंतच्या रस्त्यावर भूगर्भ स्तरांच्या परीक्षाणाच्या कामासाठी बॅरिकेडींग करण्यात आले आहे. तसेच निगडी ते दापोडी मार्गावर मेट्रोची कामे अर्धवट झाली आहेत.
वल्लभनगर बसस्थानकाच्या विकासनाचे काम, संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन येथूनही स्थानकाच्या आवारामधून व परिसरातून येणाऱया पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पालखी सोहळामार्गस्थ होताना अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात. २५ जूनपासून पालखीमार्गावरील पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होईपर्यंत मेट्रोची सर्व कामे बंद ठेवावीत, असे पत्र महापालिकेने मेट्रो प्रशासनाला दिले आहे.
पालखी काळात वारकरी बांधवांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आहे. पालखी शहरातून मार्गस्थ होईपर्यंत सध्या सुरू असलेले काम बंद ठेवण्यात येणार आहे.- हेमंत सोनवणे, महामेट्रो, कार्यकारी संचालक जनसंपर्क आणि प्रशासन.





