Pune: संत तुकाराम महाराज सोहळाही विसावणार भव्य मांडवात

हडपसर – आषाढी वारी पालखी सोहळ्याचे स्वागत आणि विसावा हडपसर येथे असतो. या दोन्ही पालखी सोहळात पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना आमदार चेतन तुपे पाटील यांनी केली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा ज्याप्रमाणे मंडपात असतो. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या पालखी विसाव्यासाठीही तशाच स्वरूपाचा भव्य मंडप विसाव्याशेजारी उभारण्यात येणार आहे, तेथूनच भाविकांना सुलभ दर्शन देण्याचे नियोजन करावे, असेही आमदार तुपे यांनी प्रशासनाला सुचवले आहे.
हडपसर येथील साने गुरुजी भवन येथे पालखी सोहळा स्वागत नियोजन बैठक झाली. यावेळी आमदार चेतन तुपे पाटील, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजन महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक मोरे महाराज, संतोष महाराज मोरे, संजय मोरे महाराज, वैशाली बनकर, सुनील बनकर, नंदा लोणकर, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे, सुभाष पावरा , डॉ.दिनेश भेंडे , डॉ.स्नेहल काळे, संजय घनवट, डॉ.शंतनू जगदाळे, मनोज घुले, अमर तुपे, माऊली कुडले, योगेश गोंधळे, वैष्णवी सातव, भारती तुपे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
“मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात येत आहे. रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे कंटेनर, निर्माल्य कलश आणि २० घंटा गाडी ठेवण्यात येणार आहे. औषध फवारणी तसेच केली जाणार आहे. हडपसर मधील २८ खासगी रुग्णालयात वारकऱ्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.” – बाळासाहेब ढवळे, सहायक आयुक्त, मनपा
मोरे महाराज म्हणतात…
पालखी सोहळा व दिंड्या पुढे जाण्यासाठी पुरेसा रस्ता उपलब्ध करून द्यावा, पालखी सोहळा विसाव्यावर अर्धा तास जास्त थांबवता येईल. विसाव्याच्या ठिकाणी जास्त वेळ थांबता येत नाही. भाविकांनी व प्रशासनाने मोठा रस्ता उपलब्ध करून दिला.
तर, विसाव्याच्या ठिकाणी अर्धा तास जास्तीचा विसावा देऊन भाविकांना दर्शन उपलब्ध करून देता येईल, असे भानुदास महाराज मोरे यांनी सांगितले. तसेच, माणिक महाराज मोरे म्हणाले की, फराळाचे वाटप करण्यापेक्षा वृक्षाची लागवड केली तर, वारकऱ्यांना चिरंतर सावली मिळण्यास मोठी मदत होइल.





