Jyoti Malhotra : पाकिस्तानी गुप्तहेर ज्योती मल्होत्राची लालबागच्या राजाला भेट; चारवेळा मुंबई दौरा केल्याचं उघड

Jyoti Malhotra | Lalbaghcha Raja – पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राची चौकशी सतत केली जात आहे. या सगळ्यामध्ये ज्योती मल्होत्राबद्दल दररोज मोठे खुलासे होत आहेत. एनआयए आणि इतर गुप्तचर संस्थांसोबतच आता मुंबई पोलिसही ज्योती मल्होत्राची चौकशी करणार आहेत.
सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीदरम्यान, ज्योतीने कबूल केले आहे की, ती २०२३ आणि २०२४ मध्ये अनेक वेळा मुंबईला आली होती. मुंबई दौऱ्यादरम्यान तिने लालबागचा राजा पाहिला. यावेळी तिने अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो काढले आणि व्हिडिओही बनवला.
ज्योती जुलै २०२४ मध्ये एका लक्झरी बसने मुंबईला पोहोचली. यानंतर, ती ऑगस्ट २०२४ मध्ये कर्णावती एक्सप्रेसने अहमदाबादहून मुंबईला आली. त्यानंतर एका महिन्यानंतर, म्हणजे त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये, ती पुन्हा एकदा दिल्लीहून मुंबईला गेली. २०२३ मध्ये, ती गणपती उत्सवादरम्यान गणपतीच्या दर्शनासाठी आली होती आणि लाखोंच्या गर्दीचा आणि संपूर्ण परिसराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.
माहिती समजल्याशिवाय बातमी नको…
विविध एजन्सींनी केलेल्या चौकशीत ज्योतीने तिच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून अनेक व्हिडिओ आणि फोटो डिलीट केल्याचे समोर आले आहे. पण हे सर्व फोटो आणि व्हिडिओ आता परत मिळवळ्यात आले आहेत. ज्योतीने हे व्हिडिओ कोणाला पाठवले होते आणि त्यामध्ये काही संवेदनशील माहिती होती का, याचा तपास आता मुंबई पोलिस करत आहेत.
पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले की, या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. पण तपास पूर्ण होण्यापूर्वीच सोशल मीडियामध्ये ज्योती मल्होत्राबद्दल ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत, ते बरोबर नाही.
तपासादरम्यान, अनेक निराधार बातम्या चालवल्या जात आहेत, जे चुकीचे आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासावरही वाईट परिणाम होत आहे. सर्व तपास संस्था आणि पोलिसांच्या तपासादरम्यान, ज्योती कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होती, हे सिद्ध करणारे कोणतेही तथ्य आतापर्यंत समोर आलेले नाही.





